येमेनमधील हूथी दहशतवाद्यांवर मोठी कारवाई, अमेरिका-ब्रिटनसह 7 देशांचा 18 ठिकाणांवर हल्ला

येमेनमधील हूथी दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर अमेरिका-ब्रिटनसह 7 देशांच्या सैन्याने संयुक्तपणे कारवाई केली आहे. यूएस सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, येमेनची राजधानी साना येथील हूथी दहशतवाद्यांच्या 18 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे.

हूथी दहशतवाती अमेरिका आणि मित्र राष्ट्रांकडून येमेनला मानवतेच्या दृष्टीने दिली जाणारी मदत थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. दहशतवादी मालवाहू जहाजांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर हल्ला केल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले. ब्रिटन आणि अमेरिकन सैन्यासह ऑस्ट्रेलिया, बहारीन, कॅनडा, डेन्मार्क, नेदरलँड आणि न्यूझीलंडच्या सैन्यानेही संयुक्तपणे या कारवाईत सहभाग घेतला.

हूथी दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमुळे जागतिक व्यापारही विस्कळीत झाला असून शिपिंगचे दरही वाढले आहेत. हे दहशतवादी येमेनला मदत घेऊन येणाऱ्या जहाजांवरही हल्ला करत आहेत. त्यामुळे जहाजासह मदतीच्या सामानाचेही नुकसान होत आहे. त्यामुळे 7 देशांनी मिळून या हूथी दहशतवाद्यांच्या कारवायांना उत्तर देण्याचा निर्णय घेतला. सात देशांनी येमेनमधील 8 ठिकाणी कारवाई करत हूथी दहशतवाद्यांच्या 18 ठिकाणांवर एकजुटीने हल्ला चढवला.

हूथी दहशतवादी कोण आहेत?

1994 च्या येमेनी गृहयुद्धानंतर येमेनमधील वाढत्या सौदी अरेबियाच्या प्रभावाचा प्रतिकार करण्यासाठी 1990 च्या दशकाच्या सुरुवातीस Houthis किंवा Houthi चळवळीची स्थापना झाली. हा गट झैदी-शिया अल्पसंख्याकांचा सदस्य हुसेन बदरेद्दीन अल-हूथी यांनी तयार केला होता, जो त्यावेळी येमेनच्या लोकसंख्येच्या जवळपास 33 टक्के होता आणि उत्तर येमेन आणि सादाह शहराजवळील प्रमुख शक्ती दलाल होते. इराणने आखातामध्ये तयार केलेल्या ‘विद्रोहाच्या अक्षा’चा (अ‍ॅक्सिस ऑफ रेझिस्टन्स) सदस्य असलेली हूथी ही येमेनी अतिरेकी संघटना आहे. त्यांना इराणकडून शस्त्रास्त्रे, दारूगोळ्यासह ड्रोनसारख्या आधुनिक युद्धसाहित्याचा पुरवठा होतो.