अमेरिका-इराण संघर्ष – पडसाद आणि परिणाम

1144

>> कर्नल अभय बा. पटवर्धन

अमेरिकेने गेल्या आठवडय़ात बगदाद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर केलेल्या हल्ल्यात इराणचे वरिष्ठ लष्करी अधिकारी कुड्स फोर्सचा सर्वेसर्वा कासीम सुलेमानी मारला गेला. त्यावरून बिथरलेल्या इराणने इराकमधील अमेरिकन सैन्यतळांवर क्षेपणास्रांचे प्रतिहल्ले केले. पुढेही तोडीसतोड बदला घेण्याची भाषा इराण करीत आहे. या दोन देशांतील वाढता तणाव जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. कारण ही ठिणगी नव्या युद्धाचा वणवा पेटविणारी ठरू शकते. तसे झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेला त्याचे प्रचंड दुष्परिणाम भोगावे लागतील. त्यात हिंदुस्थानही आलाच. त्यामुळे या सर्व घडामोडींत सावध आणि संदिग्ध भूमिका घेणे हिंदुस्थानला सोयीचे ठरेल.

इराकमध्ये इराणचे अमेरिकाविरोधी गनिमी सैनिक कार्यरत असल्याचा अमेरिकेचा आरोप नवीन नाही. त्याला अनुषंगून अमेरिकेने नुकतेच इराकमधील इराणचा पाठिंबा असलेला आणि हिंसक कारवाया करणाऱया ठिकाणांवर हल्ले केले होते. त्याचा बदला म्हणून इराणने बगदादमधील अमेरिकेच्या दूतावासावर हल्ला केला होता. तेथे आंदोलन करणाऱयांवर अमेरिकी सैन्याने अश्रूधुराचा वापरही केला होता. या सर्व प्रकारामागे इराण असल्याचा स्पष्ट आरोप अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता आणि याची जबर किंमत इराणला मोजावी लागेल, असेदेखील ट्विट केले होते. 3 जानेवारी 2020 रोजी बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमेरिकेने घडवून आणलेला ड्रोनचा हल्ला आणि त्यात इराणचे ज्येष्ठ आणि ताकदवान लष्करी अधिकारी तसेच ‘कुड्स’ या इराणी गनिमी सैन्यदलाचे प्रमुख कासीम सुलेमानी यांचा झालेला खात्मा या घटनाक्रमाला ट्रम्प यांच्या वरील ट्विटची पार्श्वभूमी आहे. सुलेमानी याच्यासह मिलिशिया कमांडर अबू महदी अल मुहादीस तसेच मोहम्मद रेधा अल जबरी हेदेखील या हल्ल्यात ठार झाले. अमेरिकेच्या ‘एमक्यू-9 रिपर’ या ड्रोनच्या अचूक बॉम्बफेकीने ही सर्व मंडळी अल्लाला प्यारी झाली.

1941 मध्ये अमेरिकेने एका जपानी ऍडमिरलची हत्या घडवून आणली होती. त्यानंतर म्हणजे जवळपास 80 वर्षांनी दुसऱयाच देशाच्या एखाद्या अतिवरिष्ठ लष्करी अधिकाऱयाला लक्ष्य करून ठार केले आहे. अमेरिकेच्या या ज्वालाग्राही कारवाईचे वर्णन माजी उपराष्ट्रपती ज्यो बिदेन यांनी ‘‘प्रेसिडेंट ट्रम्प जस्ट टॉस्ड स्टिक ऑफ डायनामाइट इन ए टिंडर बॉक्स’’ या शब्दांत केले आहे. त्यावरूनही अमेरिकेच्या या कारवाईचे एकूण गांभीर्य लक्षात येते.

कासीम सुलेमानी हा कोण आहे, तो प्रमुख असलेले कुड्स दल हा नेमका काय प्रकार आहे, अमेरिकेच्या या हल्ल्याचे फक्त इराण-अमेरिका संबंधांवरच नव्हे, तर एकूणच जागतिक सामरिक संबंधांमध्ये काय तणाव निर्माण होतील, परिवर्तन होतील, एखाद्या नव्या युद्धाची ठिणगी यातून पडेल का, देशोदेशींच्या अर्थव्यवस्थांना नेमके काय तडाखे बसतील, आधीच मंदीने होरपळणाऱ्या जागतिक अर्थव्यवस्थेवर ट्रम्प यांच्या या कारवाईचे कोणते परिणाम होतील, असे अनेक प्रश्न या ड्रोन हल्ल्याच्या निमित्ताने निर्माण झाले आहेत.

कासीम सुलेमानी हा एका शेतकऱयाचा मुलगा. शाळेत असताना तो बांधकाम मजूर म्हणूनही काम करीत असे. शालेय शिक्षण संपल्यावर काही दिवस त्याने केरमन नगरपालिकेत कारकुनाची नोकरीही केली. 1979 मध्ये इराणमध्ये झालेल्या इस्लामी क्रांतीमुळे आयातुल्ला खोमोनी यांच्या कर्मट नेतृत्वाचा उदय झाला आणि इराण नरेश रझा पहलवी यांना पदभ्रष्ट करत इस्लामिक रिपब्लिकची स्थापना झाली. या सर्व वातावरणाने भारावलेला कासीम सुलेमानी 1980 मध्ये ‘आयआरजीसी’ म्हणजे इराण रिव्होल्युशनरी गार्ड कोअर या सैन्य दलात भरती झाला. 1980 ते 88 या काळात इराक सीमेवर तो एका गनिमी तुकडीचा कमांडर म्हणून कार्यरत होता. या युद्धातील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याची गणना इराणच्या पहिल्या 10 योद्धय़ांमध्ये होऊ लागली. त्याचीच बक्षिसी म्हणून 1998 मध्ये ‘कुड्स फोर्स’ हे इराणचे गनिमी सैन्य दल सुलेमानीच्याच नेतृत्वाखाली अस्तित्वात आले. इराणमध्ये होणाऱया गुप्त घातपाती कारवायांपासून तसेच खोमेनी सरकारला अंतर्गत बंडाळीपासून वाचविण्याची जबाबदारी सुलेमानीवर सोपविली गेली. तर असा हा कासीम सुलेमानी. अमेरिकेच्या विरोधात केलेल्या अनेक गुप्त कारवायांचा पडद्यामागील सूत्रधार.

इराणने तर अमेरिकेला जशास तसे उत्तर दिले जाईल, अशी जाहीर धमकीच दिली आहे. इराणकडे अमेरिकेसारखे लांबवर मारा करणारे अत्याधुनिक ड्रोन्स नसले तरी त्यांच्या गुप्तचर विभागात आणि सैन्यामध्ये अतिउत्कृष्ट स्नायपर्स, स्फोटतज्ञ आणि स्फोटके वापरणारे (टेक्निशियन्स ऑफ डेथ) यांची कमतरता नाही. त्यामुळे अमेरिकन लष्करी अधिकारी किंवा इतर लोकांना मारणे इराणी जिहाद्दय़ांना फार अशक्य आहे असे नाही याचे भान ट्रम्प प्रशासन आणि पेण्टॅगॉनला ठेवावेच लागेल. कारण ज्या राष्ट्राचा नेता मारला जातो ते राष्ट्र अशा हत्येबाबत कशी प्रतिक्रिया व्यक्त करते यावर मूळ कारवाईचे मूल्यमापन केले जाते. इराणचे राष्ट्रपती आयातुल्ला अली खोमेनी यांनी जबर बदला घेण्याची धमकीच दिली आहे. 4 जानेवारी रोजी बगदादमधील अमेरिकन दूतावासावर रॉकेट आणि प्रक्षेपणास्त्रांचे हल्ले केले आहेत. त्यावरून अमेरिकेच्या सुलेमानी हत्येबद्दल इराण किती पेटला आहे हे लक्षात येऊ शकते.

अमेरिकेलाही या सर्व प्रतिशोधाची कल्पना आहेच. 3 जानेवारी रोजी सुलेमानीचा खात्मा झाल्यानंतर लगेचच अमेरिकेचे 3500 पॅराटपर्स संभाव्य कारवाईसाठी सौदी अरेबियाला रवाना झाले आहेत. शिवाय गरज भासली तर आणखी सैनिक मध्यपूर्वेत पाठविले जातील, असे अमेरिकन संरक्षण सचिव मार्क एस्पर यांनी सांगितले आहे. इराक- इराणची धमकी आणि त्याला प्रत्युत्तर देण्याची अमेरिकेची तयारी पाहता हा संघर्ष केवळ इराण-इराक किंवा मध्यपूर्वेपुरता मर्यादित राहणे मुश्किल आहे; किंबहुना जगात जेथे जेथे दहशतवादी स्लीपर सेल्स कार्यरत आहेत त्या त्या ठिकाणी या कारवाईचे पडसाद उमटणार आहेत. त्यामुळेच अमेरिका-इराणमधील हा संघर्ष जागतिक महायुद्धाची ठिणगी टाकतो का, अशी भीतीदेखील व्यक्त होत आहे. अर्थात इराणसंबंधीचे विश्लेषक दीना इस्फंदीअरी यांच्या म्हणण्यानुसार इराण अमेरिकेच्या या कारवाईचा तोडीस तोड बदला नक्की घेईल, पण त्यातून सर्वंकष युद्ध सुरू होणार नाही याची काळजीही घेईल. मध्य पूर्वेतील येमेन, लेबनॉन, इस्राईलमधील अमेरिकन सैन्य तळ कदाचित इराणच्या कुड्स दलांचे भविष्यातील लक्ष्य असू शकते. अमेरिका जेथे जेथे आहे त्या सर्व राष्ट्रांमध्ये इराण त्या त्या देशातील दहशतवादी स्लीपर्स सेलच्या सहाय्याने जिहादी हल्ले करू शकतो. इराकमध्ये असलेले 15 हजार अमेरिकन सैनिक आणि मध्य पूर्वेतील 55 हजार सैनिक इराणच्या ‘रडार’वर येऊ शकतात. 2003 ते 2018 या काळात इराणचे लष्कर तसेच कुड्स दलाकडून इराकमध्ये 958 अमेरिकन सैनिक मारले गेले आहेत हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

हिंदुस्थानवरील परिणाम
अमेरिका-इराण यांच्यातील या संघर्षाचे हिंदुस्थानवरही विविध परिणाम होणे स्वाभाविकच आहे. प्रामुख्याने तेलपुरवठय़ाबद्दल कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर या संघर्षाबाबत हिंदुस्थानला आपली भूमिका संदिग्धच ठेवणे भाग आहे. कारण-
1) हिंदुस्थानच्या 24 कोटी मुसलमान नागरिकांपैकी 48 टक्के शिया पंथीय आहेत. त्यामुळे अमेरिका इराण-युद्ध झाले तर हिंदुस्थानातील शिया-सुन्नी मुस्लिमांत धार्मिक यादवीची ठिणगी पडून परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.
2) अमेरिकेच्या या ड्रोनहल्ल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला लष्करी प्रशिक्षण देण्याची ऑफर दिली आहे. हिंदुस्थानसाठी ही नक्कीच चिंतेची बाब आहे. कारण यानंतरचे स्वाभाविक पाऊल अमेरिकेने पाकिस्तानला आर्थिक आणि सामरिक सहाय्य देण्याचे असेल.
3) अमेरिका आणि पाश्चात्य देशांमध्ये हिंदुस्थानचे आर्थिक तसेच सामरिक संबंध गुंतलेले आहेत, तर इराण आणि मध्य पूर्व देशांमधील सुमारे 70 लाख हिंदुस्थानी कार्यरत आहेत. दरवर्षी त्यांच्याकडून आपल्याला अंदाजे 76 अब्ज डॉलर्सचे परकीय चलन गंगाजळीच्या रूपात मिळत असते. यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त नागरिक इराण, सौदी अरेबिया, कुवेत, अरब अमिराती आणि बहरीनमध्ये आहेत. इराणने जर या देशांविरुद्ध कारवाई करायचे ठरवले तर या सर्व देशांमधील हिंदुस्थानी नागरिकांची तेथून वापसी करण्याची आव्हानात्मक जबाबदारी हिंदुस्थानी वायुदल आणि विमान कंपन्यांना पार पाडावी लागेल. त्याचा परिणाम परकीय गंगाजळी कमी होण्यात होईल.
4) इराणमधील चाबहार बंदर, इराण-अफगाणिस्तान-युरेशिया रेल्वे लाइन आणि इतर पायाभूत सुविधांच्या उभारणीत हिंदुस्थानची सुमारे 2 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे ती पाण्यात जाईल.
5) युद्ध झाले तर इराणकडून होणारा आपला 60 टक्के तेलपुरवठा पूर्णपणे खंडित होईल. त्यामुळे हिंदुस्थानात तेलाच्या किमती प्रचंड वाढतील आणि महागाईचा भडका उडेल. हिंदुस्थानी रुपयाचे अवमूल्यनदेखील होण्याचा धोका आहेच. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर आणखी दुष्परिणाम होईल.
6) या दोन देशांतील युद्ध जर अणुयुद्ध किंवा तिसऱया महायुद्धात परिवर्तीत झाले तर त्यामुळे होणारा किरर्णोत्सार तसेच अण्वस्त्र्ा धूळ यांचे दूरगामी भयंकर परिणाम हिंदुस्थानला भोगावे लागतील.

जनरल कासीम सुलेमानीच्या हत्येनंतर मध्यपूर्वेत तीन सामरिक रूपरेषा (सिनॅरिओज) निर्माण होतात.
इराण या घटनेची कशी मीमांसा करतो, त्याला कोणते पर्याय उपलब्ध आहेत, त्याची आंतरिक आणि बाह्य राजकीय तसेच आर्थिक संकटांना तोंड देण्याची ताकद किती आहे यावर इराणी बदल्याची तीव्रता अवलंबून राहील. जर बदला तोडीसतोड घ्यायचा असेल तर या क्षेत्रातील अमेरिकन सैन्य तळांवर इराणची गाज कोसळू शकते. अर्थात इराण हा पर्याय अवलंबणार नाही. कारण भविष्यात अमेरिकन कारवाईत इराणची लष्करी क्षमता आणि पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची भीती असेल.

अमेरिका व त्याच्या मित्र राष्ट्रांना इराण छुप्या युद्धाद्वारा नेहमीसारखे हैराण करीत राहील. मात्र यामुळे इराणची खंबीर राष्ट्र अशी असलेली प्रतिमा धूसर होईल. जर इराणने हा पर्याय अंगिकारला तर तो निवडक, छोटे तीव्र हल्ले करून अमेरिका व मित्र राष्ट्रांची मोठी जीवित आणि वित्तहानी करेल. त्याचा मोठा प्रपोगंडा करून आपली प्रतिमा जगात मोठी करेल.
इराण बदला घेण्यासाठी योग्य वेळ आणि काळाची प्रतीक्षा करेल. ती मिळताच योग्य कृती करेल. 1990मध्ये त्यांनी इस्रायलसाठी अशीच कारवाई केली होती. या दरम्यान तो अमेरिकेच्या वरिष्ठ सैनिकी आणि नागरी अधिकाऱयाची हत्या करून कासीम सुलेमानी हत्येचा बदला घेईल. त्यामुळे इराणची जीवित आणि वित्तहानी कमीत कमी होईल. अर्थात त्यामुळे त्याला सीरिया, इराक, येमेन आणि जगातील आपल्या इतर समर्थकांना वाऱयावर सोडावे लागेल.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या