मायक्रोसॉफ्ट-उबरला ‘एआय’चा मोह महागात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात एआयमुळे जगभरातील कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे. एआयवर फोकस केल्याने जगभरातील टेक कंपन्या धडाधड कर्मचारी कपात करून एआयमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत, परंतु एआय वापरणे मायक्रोसॉफ्ट आणि उबर कंपनीला चांगलेच महागात पडले आहे. जगातील अनेक कंपन्यांना एआय आता पांढरा हत्ती भासू लागला आहे. कामात वेग मिळत असला तरी यासाठी मात्र पगाराच्या तुलनेत खर्च जास्त येत आहे.

‘मायक्रोसॉफ्ट’ने आपल्या हजारो सॉफ्टवेअर इंजिनीअर्सना कोडिंग, डिबगिंग आणि कोड रिह्यूसाठी ‘क्लाऊड कोड’ या एआय टूलचा वापर करण्याची परवानगी दिली होती. सुरुवातीच्या सहा महिन्यांत इंजिनीअर्सनी या टूलचा भरभरून वापर केला, पण खरी अडचण तेव्हा सुरू झाली, जेव्हा या वापराचे बिल कंपनीसमोर आले. तेव्हा कंपनीला हादरा बसला. कंपनीने खर्च कमी करण्यासाठी आपल्या मालकीच्या स्वस्त टूल्सला प्राधान्य दिले आहे.

असाच काहीसा फटका कॅब सर्व्हिस कंपनी ‘उबर’लाही बसला आहे. उबरने इंजिनीअर्ससाठी याच ‘क्लाऊड कोड’ टूलची सुरुवात केली होती. मार्च 2026 पर्यंत कंपनीच्या 5,000 इंजिनीअर्सपैकी तब्बल 84 टक्के लोक हे टूल वापरत होते. मात्र यामुळे इंजिनीअर्सचा एआय वापरण्याचा वैयक्तिक खर्च दरमहा 40,000 ते 1.6 लाख रुपयांपर्यंत येत होता. कंपनीने वर्षासाठी निश्चित केलेले एआयचे बजेट एप्रिल 2026 पर्यंतच पूर्णपणे संपले, असे उबरचे सीईओ प्रवीन नेप्पल्ली नागा यांनी सांगितले.

‘कम्प्युट कॉस्ट’ महाग!

एआय चिप आणि जीपीयू बनवणारी कंपनी ‘एनव्हिडिया’चे व्हाईट प्रेसिडेंट ब्रायन कॅटानझारो यांच्या म्हणण्यानुसार, स्वतःच्या टीमसाठी कॉम्प्युटर चालवण्याचा आणि डेटा प्रोसेस करण्याचा खर्च हा तिथे काम करणाऱ्या मानवी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या एकूण पगारापेक्षाही जास्त झाला आहे. संपूर्ण जगाला एआय इन्फ्रास्ट्रक्चर विकणाऱ्या कंपनीच्या घरातच जर एआय चालवणे मानवापेक्षा महाग होत असेल, तर ही इतर कंपन्यांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.