एलईडीकरणातून ‘मरे’ची 13 कोटींची बचत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मध्य रेल्वेने यंदा 2017-18 आर्थिक वर्षांत रेकॉर्डब्रेक 61.36 दशलक्ष टनाची मालवाहतूक केली असून तसेच रेल्वेचे भंगार हटवून त्यातूनही 252 कोटी रुपये मिळविले आहेत. मध्य रेल्वेच्या 432 स्थानकांत पारंपरिक दिव्यांऐवजी शंभर टक्के एलईडी दिवे बसवून त्याद्वारे वर्षाला 142.36 युनिट वाचवित 13.10 कोटी रुपयांची वीज बचत करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी आज येथे स्पष्ट केले. मध्य रेल्वेच्या मुख्यालयात त्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, मध्य रेल्वेने पायाभूत सुविधा आणि प्रवासी सुरक्षेत वाढ करण्याचे धोरण सुरूच ठेवले असून याबरोबरच 2017-18 या आर्थिक वर्षांत 61 मानवरहित रेल्वे फाटके बंद केली असून यंदा सात मानवरहित फाटके बंद करण्यात येतील. 2017-18 या आर्थिक वर्षांत मध्य रेल्वेवर 25 पादचारी पूल कार्यरत झाले असून आणखी चार पादचारी पूल 2018-19 मध्ये कार्यरत होतील असेही त्यांनी सांगितले. ठाकुर्ली येथे उड्डाणपूल कार्यरत झाल्याने उपनगरीय लोकल सेवेच्या वेळापत्रकात त्यामुळे सुधारणा होईल. बेलापूर-सीवूड-उरण प्रकल्पाचा भाग म्हणून बेलापूर आणि नेरूळ येथे नवीन आरआरआय यंत्रणेसह यार्ड रिमॉडेलिंग करण्यात आले असल्याचे शर्मा यांनी आपल्या भाषणात सांगितले.  

12 लोकलमध्ये महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही

ज्येष्ठ नागरिकांसाठी मध्य रेल्वेवर 2017-18 या आर्थिक वर्षांत 44 सरकते जिने, 25 लिफ्ट पुरविण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेवर हार्बरवर 10 तर ट्रान्सहार्बरवर 16 अशा 26 अतिरिक्त फेर्‍या यंदा सुरू करण्यात आल्या. हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार होऊन तेथे 42 जादा फेर्‍या चालविण्यात येत आहेत. मध्य रेल्वेवर आधुनिक 21 बम्बार्डिअर लोकल चालविण्यात येत असून त्यातील 12 गाड्यांमध्ये महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही यंत्रणा आहे.  

पश्चिम रेल्वेची पाच कोटींची बचत

पश्चिम रेल्वेने सर्वच्या सर्व 726 स्थानकांत एलईडी दिवे बसविले जात असून त्यातून सात दशलक्ष युनिट वीज आणि सुमारे पाच कोटी रुपयांची बचत होणार आहे. पश्चिम रेल्वेने पहिल्या चार वर्षांत 27 दशलक्ष टन मालवाहतूक केली असून गेल्या वर्षीच्या चार महिन्यांच्या तुलनेत 13 टक्के वाढ झाली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए. के. गुप्ता यांनी दिली.  

आरपीएफची बाईक रॅली

आरपीएफच्या ‘182 सुरक्षा हेल्पलाइन’ची जनजागृती करण्यासाठी बाईक रॅलीही काढण्यात आली. अतिरिक्त महाव्यवस्थापक विशाल अग्रवाल, आरपीएफचे प्रधान मुख्य सुरक्षा आयुक्त व महानिरीक्षक ए. के. श्रीवास्तव, विभागीय व्यवस्थापक एस. के. जैन, वुमेन्स वेल्फेअर ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा ममता शर्मा आदी यावेळी उपस्थित होते.