
सामना ऑनलाईन । लखनौ
अवैध गौणखनीज खोदकाम प्रकरणी उत्तर प्रदेशमध्ये सीबीआयची छापेमारी सुरुच असून यात माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचेही नाव समोर आले आहे. या छापेमारीनंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आलेल्या अखिलेश यादव यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. ही कारवाई राजकीय सूड बुद्धीने सुरू असून आमच्याकडे ‘महाआघाडी’ आहे तर भाजपकडे ‘सीबीआय’ असल्याचा टोला त्यांनी लगावला.
उत्तर प्रदेशात सपा-बसपाचे जमले, 39-39 जागांवर एकमत
लखनौच्या दबंग आयएएस अधिकारी बी. चंद्रकला यांच्या घरावर सीबीआयने छापे टाकून त्यांची बँक खाती गोठवली, तसेच हमीरपूरय येथे सपा नेत्याच्या घरावरही सीबीआयने छापे टाकले. सीबीआयच्या या छापेमारीवर पलटवार करताना अखिलेश यादव म्हणाले की, ‘आम्ही महाआघाडी करू शकतो, जनतेमध्ये जाऊ शकतो आणि जे आम्हाला रोखू इच्छितात त्यांच्याकडे सीबीआय आहे.’
सीबीआयची कारवाई राजकीय हेतूने
अवैध गौणखनीज खोदकाम प्रकरणी सीबीआयने केलेली कारवाई राजकीय हेतून सुरू असल्याचे अखिलेश यादव म्हणाले. सीबीआयचे स्वागत असून यापूर्वी काँग्रेसने सीबीआयशी भेटण्याची संधी दिली होती आणि भाजप देत आहे. सीबीआयला छापेमारी किंवा चौकशी करायची असेल तर खुशाल करावी, मी तयार असून विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दिली जातील, असेही ते म्हणाले.
दबंग आयएएस चंद्रकला यांच्या घरावर सीबीआयचे छापे, बॅंक खाती गोठवली
भाजपकडून सीबीआयचा वापर
भाजपच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अखिलेश यादव म्हणाले की, आम्ही एक्सप्रेस वे बनवला तर त्याचीही चौकशी करण्यात आली. भाजपकडे जे आहे त्याचा ते वापर करत आहेत. त्यांच्याकडे सीबीआय असून आमच्याकडे पाठवत आहे. त्यांच्याकडे पैसे असून जाहिरातीवर पाच हजार कोटी खर्च केल्याचे उघड़ झाले आहे, असेही ते म्हणाले. तसेच या पैशांचा हिशोब सध्या समोर आला नाही परंतु यातून दिसून येते की कोणाला किती मिळाले असतील. तसेच भाजपकडे आता फक्त 100 दिवस बाकी आहेत, असेही अखिलेश यादव म्हणाले.


























































