उत्तर प्रदेशात सपा-बसपाचे जमले, 39-39 जागांवर एकमत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिध । लखनौ

उत्तर प्रदेशात अखेर हो-ना करता करता समाजवादी पार्टी व बहुजन समाज पार्टी यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी सख्य झाले आहे. दोन्ही पक्षांनी 80 पैकी 39-39 अशा समान जागा लढवण्याचे ठरवले असून अमेठी व रायबरेली या दोन जागा काँग्रेसला सोडण्यावर सहमती झाली आहे. यासंदर्भातील अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 80 जागा आहेत. 2014 च्या निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात 71 जागांवर लॉटरी लागली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही मतदारांनी समाजवादी पार्टीला झिडकारत सत्ता भाजपच्याच हाती सोपवली. मध्यंतरीच्या कालावधीत उत्तर प्रदेशात झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाला. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्येही मतदारांनी भाजपला साफ झोपवले. 2019 च्या निवडणुकीत भाजपला रोखायचे असेल तर विरोधी पक्षांनी एकत्र यावे असे प्रयत्न सुरू झाले.

काँग्रेसने यासाठी पुढाकार घेतला. महाआघाडीच्या स्थापनेसाठी भाजपविरोधी पक्षांची मोट बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या, मात्र बसपाने या आघाडीत सामील होण्यास नकार दिला. त्यानंतर सपा व बसपाच्या युतीची चर्चा सुरू झाली. शुक्रवारी अखिलेश यादव व मायावती यांच्यात जागावाटपावरून एकमत झाले. 80 पैकी दोन जागा अमेठी व रायबरेलीत सपा व बसपा उमेदवार उभे करणार नाही आणि उर्वरित जागांचे समान वाटप करण्यावर दोघांचे एकमत झाले. या जागा कोणत्या हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. महिनाअखेरीस अधिकृत जागावाटपाची घोषणा करण्यात येणार असल्याचे सपाच्या सूत्रांनी सांगितले.