
उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे मंत्री आणि आमदारांच्या राजीनामा सत्रामुळे भाजप हैराण झाला आहे, तर दुसरीकडे शिवसेना सर्व ताकदीनिशी उत्तर प्रदेशच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहे. त्यादिशेने रणनीतीही आखली जात आहे. शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाली. उभय नेत्यांमध्ये यावेळी शेतकऱयांच्या विविध मुद्दय़ांबरोबरच उत्तर प्रदेशातील सद्यस्थितीबाबतही बोलणे झाले. दोन परिवर्तनवादी नेत्यांमधील या चर्चेनंतर उत्तर प्रदेशच्या राजकारणातही चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज शेतकरी नेते राकेश टिकैत यांची उत्तर प्रदेशातील मुझफ्फरपूर येथे भेट घेतली. त्यावेळी टिकैत यांनी खासदार राऊत यांच्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. खासदार राऊत यांनी तत्काळ दूरध्वनीवर उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून टिकैत यांच्याबरोबर त्यांचे बोलणे करून दिले. टिकैत यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि नंतर उत्तर प्रदेशातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीबाबतही त्यांना माहिती दिली. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी, ‘लढाई अजून संपलेली नाही. ती अर्धवट टाकून चालणार नाही.’ असे टिकैत यांना सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे आणि टिकैत यांच्यात झालेल्या या चर्चेनंतर उत्तर प्रदेशातील राजकीय चर्चाही रंगू लागल्या आहेत.






























































