Uttar Pradesh Assembly Elections 2022: पहिल्या टप्प्यात डागाळलेले उमेदवार देण्यात भाजप पहिल्या क्रमांकावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
neta-leader

Uttar Pradesh Assembly Elections 2022 : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 च्या पहिल्या टप्प्यात मतदान सुरू आहे. या टप्प्यात 11 जिल्ह्यांतील एकूण 58 जागांसाठी निवडणूक होत असून, त्यासाठी एकूण 623 उमेदवार रिंगणात आहेत. इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) नुसार, 25 टक्के उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे.

उत्तर प्रदेशातील सत्ताधारी भाजपने एकूण 57 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यापैकी 29 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. सर्वच पक्षांच्या गुन्हेगारी प्रतिमेच्या उमेदवारांमध्ये भाजपच्या अशा उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. काँग्रेसने 58 जागांवर उमेदवार उभे केले असून त्यापैकी 21 जागांवर गुन्हे दाखल आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

राज्याचा प्रमुख विरोधी पक्ष सपाने 28 तर आरएलडीने 29 उमेदवार उभे केले आहेत. त्यांचे अनुक्रमे 21 आणि 17 उमेदवारांवर गुन्हे आहेत.

कोट्यधीश उमेदवार उभे करण्यातही भाजप आघाडीवर आहे. त्यांच्या 57 उमेदवारांपैकी 55 उमेदवार कोट्यधीश आहेत. या प्रकारात मायावतींचा पक्ष बसपा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्या एकूण 56 उमेदवारांपैकी 50 उमेदवार कोट्यधीश आहेत, तर सपाच्या 28 पैकी 23 उमेदवार आणि आरएलडीच्या 29 पैकी 28 उमेदवार कोट्यधीश आहेत. म्हणजेच भाजप आणि आरएलडीचे 96 टक्के उमेदवार कोट्यधीश आहेत. ‘आप’च्या उमेदवारांमध्ये एकूण उमेदवारांच्या संख्येपेक्षा अर्ध्याहून अधिक उमेदवारांची संपत्ती कमी आहे. आपच्या 52 उमेदवारांपैकी 22 उमेदवार कोट्यधीश आहेत.

या टप्प्यातील 58 जागांवर होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण 10,766 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. मतदानावर करडी नजर ठेवण्यासाठी 48 सामान्य निरीक्षक, आठ पोलिस निरीक्षक आणि 19 निरीक्षक तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय 2175 सेक्टर मॅजिस्ट्रेट, 284 झोनल मॅजिस्ट्रेट, 368 स्टॅटिक मॅजिस्ट्रेट आणि 2718 मायक्रो ऑब्झर्व्हर्सही तैनात करण्यात आले आहेत.

पहिल्या टप्प्यात अनेक बडे दिग्गज निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. राज्य सरकारचे मंत्री श्रीकांत शर्मा, सुरेश राणा, संदीप सिंग, कपिल देव अग्रवाल, अतुल गर्ग आणि चौधरी लक्ष्मी नारायण यांच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार आहे.