विवाहित प्रेयसीसोबत पळून जायचा होता प्लान, सासरच्यांनी बेदम मारहाण करत केली हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेमसंबंधातून एका युवकाची हत्या केल्याची भयंकर घटना नुकतीच समोर आली आहे. या युवकाला गावकऱ्यांनी बेदम चोपल्याने त्याचा मृत्यू झाला असून अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

उत्तरप्रदेशातील देवरिया जिल्ह्यात ही हत्या झाली आहे. पंकज मिश्रा असे मृत तरुणाचे नाव आहे. पंकज आणि विवाहीत महिलेचे आठ वर्षे प्रेमसंबंध होते. दोघेही लग्न करणार होते. पण प्रेयसीच्या घरच्यांनी विरोध करत तिचे लग्न दुसऱ्या मुलाशी लावून दिले होते. बिहारच्या सिवान जिल्ह्यातील देवरिया येथील तरूणाशी तिचे 8 डिसेंबरला लग्न झाले. आपल्या आधीच्या प्रियकरासोबत संपर्कात असलेल्या युवतीने बुधवारी पंकज मिश्रा याला सासरी बोलावले. आपल्या दोन-तीन मित्रांसोबत तो तिच्या सासरी आला होता. दोघांचाही पळून जाण्याचा कट होता.

घरातून पळून जात असता प्रेयसीचा नवरा आणि सासऱ्यांनी त्यांना पाहिले. त्यांना विरोध केला असता त्यांच्यामध्ये हाणामारी झाली. यात प्रेयसीचा नवरा आणि सासरे जखमी झाले. ते पाहून गावकऱ्यांनी पंकजला जबर मारहाण केली. पोलिसांना त्याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंकजला हॉस्पीटलमध्ये नेले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञाताविरोधावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.