
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदार संघ असलेल्या वाराणसीमध्ये गुरुवारी कोरोनाग्रस्तांची संख्या अचानक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अचानक रुग्ण संख्येत वाढ झाल्याने टेन्शन वाढलं आहे. वाराणसीमध्ये गुरुवारी कोरोनाचे 125 नवे रुग्ण आढळले आहेत. पहिल्यांदाच वाराणसीत 100 हून अधिक कोविड रुग्ण मिळाल्यानं लोकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
वाराणसीमध्ये गुरुवारी आढळलेली रुग्णसंख्या ही यावर्षातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. वाराणसी जिल्ह्यात सध्या 582 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत आणि आतापर्यंत 380 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वाराणसीत कोरोना साथरोगाच्या सुरुवातीपासून आतापर्यंतची संख्या 22 हजार 801 लोक कोरोनाग्रस्त झाले. शहरात इतक्या मोठ्याप्रमाणात रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाच्या टीमने सॅनिटायजेशन आणि कोविड प्रोटोकॉल पाळण्याची पूर्ण व्यवस्था करण्यास सांगितलं आहे. आरोग्य विभागाच्या टीमनी लोकांना कोरोना नियमाचे कसोशीन पालन करण्याची विनंती केली आहे.
वाराणसीमधील वाढती संख्या लक्षात घेत उद्यापासून शिक्षक आणि आंगणवाडीच्या शिक्षकांना काँटॅक्ट ट्रेसिंगवर जोर देण्यास सांगितलं आहे. आवश्यक असल्यास पाच दिवसात L1 आणि L2 रुग्णालय पुन्हा सक्रीय करण्यात येईल. सध्या BHU मध्ये 400 तर दीनदयाल रुग्णालयात 200 बेडची क्षमता आहे.
उत्तर प्रदेशात बुधवारी 24 तासात 1230 नवे रुग्ण आढळले. यापैकी लखनऊ मध्ये 361 तर त्या खालोखाल प्रयागराज येथे 213 रुग्ण आढळले.




























































