‘व्हायग्रा’ मिळवण्यासाठी दोन गावात राडा

86

सामना ऑनलाईन। उत्तराखंड

उत्तराखंडमधील पिथौरगढ जिल्ह्यातील मुनस्यारी आणि धारचुला येथील दोन गावात गेल्या अनेक दिवसांपासून राडा सुरू आहे. हा राडा जमीन हक्क किंवा फळबागांवरून नसून चक्क व्हायग्रासाठी सुरू आहे. हिमालयीन वायग्राला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असल्याने तो फक्त आपल्यालाच मिळावा यासाठी दोन्ही गावातील ग्रामस्थ लाठया काठया घेऊन रस्त्यावर उतरले आहेत.

बुई आणि पाटो अशी या गावांची नावे असून येथील रालम व राजरामभा बुग्याल या भागात व्हायग्रा मिळतो. येथील स्थानिक भाषेत त्याला कीडा जडी असे बोलले जाते. त्याच्यावरील मालकी हक्कावरून ग्रामस्थांमध्ये हा वाद सुरू आहे. हा वाद इतका विकोपाला गेला आहे की प्रशासनाला यात मध्यस्थी करावी लागत आहे. वाद सामंजस्याने मिटवा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. पण काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेले हे गावकरी एकमेकांच्या जिवावरच उठले असून सतत हाणामारी करत आहेत. यामुळे गावात 145 कलम लागू करण्यात आले आहे.

vigra-2

हिमालयात बर्फ वितळल्यानंतर व्हायग्रा मिळतो. व्हायग्रा हा एकप्रकारचा करड्या रंगाचा किडा असून तो तिबेट व पहाडी भागात मिळतो. त्यातही यातील काही किडे फक्त हिवाळ्यात मिळतात. त्यांना यारसंगुबा असेही म्हणतात. जगभरात याला मागणी असल्यानेच गावकरी यावर तुटून पडतात. लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त असलेल्या औषधींमध्ये त्याचा वापर करतात. चीनमध्ये या हिमालयीन व्हायग्राला चढ्या दराने मागणी आहे. हिमालयात जवळपास 4000 मीटर उंचावर हा किडा आढळतो. त्याची लांबी सात ते दहा सेंटीमीटर एवढी असते. तज्ज्ञांच्या मते यात विटामिन बी 12, मेनोटाल, कार्डीसोपिक अम्ल , इर्गोस्टॉल, कार्डोसेपिन आणि डिपॉक्सीनोपित ही आढळते. ज्यामुळे यौनशक्ती वाढते. नेपाळमध्येही येथूनच व्हायग्रा नेला जातो. हा व्यवसाय इतका मोठा आहे की काही व्यावसायिक हेलिकॉप्टरने हा व्हायग्रा घेऊन जातात.

आपली प्रतिक्रिया द्या