
देशात कोरोनाचे संकट आहे. त्यात लसींचा तुटवडा जाणवत असताना देशात अनेक ठिकाणी लसीकरणाबाबत गैरसमज पसरले आहेत. अशा वेळी वेगवेगळ्या प्रकारे नागरिकांना लसीकरणासाठी उद्युक्त केले जात आहे. देशाच्या काही मुस्लिमबहुल भागात लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये गैरसमज असून धर्मगुरू आणि मशिदींच्या माध्यमातून लसीकरणाचे आवाहन केले जात आहे.
बिहारच्या नालंदा भागात अल्पसंख्यांक समाजातील अनेक लोक लस घेण्यास नकार देत होते. विनंती करूनही अनेकांनी लस घेतली नाही. गावातील इमाम यांनी आवाहन केल्यानंतर अनेकांनी लस टोचून घेतली. उत्तर प्रदेशच्या मथूरामध्येही हीच परिस्थिती होती. यासाठी स्थानिक प्रशासनाने मशीदींच्या भोंग्यांचा आधार घेतला. मशीदीतून नागरिकांना लसी घेण्याचे आवाहन करण्यात आले. मथुरातील कस्बा राया भागात अजान नंतर कोरोनाची लस घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर मोठ्या संख्येने आरोग्य केंद्रात हजेरी लावली आणि लस टोचून घेतली.
उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी मदरसा आणि मशीदीतून कोरोनाचे नियम पाळले जावे असे आवाहन केले. तसेच मोठ्या प्रमाणात लसीकरण अभियानात सामील व्हावे असे आवाहन करण्यात आले होते.
देशात जम्मू जिल्ह्यात 45 हून अधिक वय असलेल्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. त्यासाठी स्थानिक धर्मगुरूंचे सहाय्य घेण्यात आले होते.




























































