वडापाव उधार न दिल्याने विक्रेत्यावर कोयत्याने वार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । यवत

उधार वडापाव देण्यास नकार दिल्याने वडापाव विक्रेत्यास कोयत्याने वार करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून वडापाव विक्रेत्याच्या गळ्यातील चांदीच्या साखळीसह साडेसहा हजार रुपये लुटले. ही घटना दौंड येथील शालिमार चौकात घडली. याप्रकरणी चारजणांविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला आहे.

सुशील माने या वडापाव विक्रेत्याने दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सागर आल्हाट (रा. कुंभार गल्ली, दौंड), रोहन विजय कांबळे, सुशांत राजू कांबळे व एकाचे नाव समजू शकले नाही (तिघेही रा. दौंड) या चारजणांविरोधात मारहाणीसह जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार (दि. २७) दौंड शहरातील शालिमार चौक येथे सुशील माने यांनी नेहमीप्रमाणे आपली वडापावची गाडी लावली होता. सायंकाळी सागर आल्हाट हा वडापावच्या गाडीजवळ येत त्याने उधार वडापावची मागणी केली. त्यावर वडापाव विक्रेता सुशील याने पैसे मागितले.

उधार वडापाव देणार नसल्याचा राग आल्याने सागरने सुशील यांना मारहाण सुरू केली. त्याचवेळी इतर तिघांनीही त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रोहन याने वडापाव विक्रेत्यावर लोखंडी कोयत्याने वार केला; पण तो चुकवल्याने सुशील याच्या डाव्या हाताच्या बोटावर लागला. मारहाण करून चौघांनी गल्ल्यातील पैसे व गळ्यातील चांदीची साखळी असा साडेसहा हजारांचा ऐवज घेऊन पोबारा केला. मारहाण करणारे चौघेही अद्याप फरार असून, कोणालाही अटक झालेली नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खरात करीत आहेत.