
वाढवण बंदराचे काम मिळवलेल्या योशीन इंजिनीयरिंग कॉर्पोरेशन या जपानी कंपनीच्या सव्र्व्हेअरना आज वाढवणवासीयांनी गावच्या वेशीवरूनच हाकलून दिले. पुन्हा गावात पाऊल ठेवाल तर खबरदार, असा इशाराच वाढवण ग्रामस्थांनी या जपानी कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला.
स्थानिक ग्रामस्थ आणि भूमिपुत्रांचा विरोध चिरडत केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा वाढवण बंदर लादण्याचा आटापिटा सुरू आहे. या बंदराचे काम योशीन इंजिनीयरिंग कॉपेरिशन या जपानी कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीचे काही अधिकारी आज वाढवण गावात आले. नागरिकांना याची माहिती मिळताच त्यांनी त्यांची कार गावच्या वेशीवरच अडवली. तुम्ही कोण आहात, कुठून आलात, अशी विचारणा केली. तेव्हा त्यांनी आम्ही बंदर उभारणीच्या सर्वेक्षणासाठी आलो आहोत असे सांगितले. गाडीतील एकाने त्यांच्या कंपनीच्या अधिकाऱ्याला फोन लावून गावकऱ्यांना दिला. तेव्हा गावकऱ्यांनी त्या अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली.
कारला घातला घेराव
जपानी अधिकाऱ्यांची कार वाढवण बंदराच्या दिशेने निघाली तेव्हा गावकऱ्यांनी या कारला चारही बाजूने घेरले आणि बंदराच्या दिशेने जाल तर खबरदार असा इशारा दिला. गावकऱ्यांचा रुद्रावतार पाहून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काढता पाय घेत गावाबाहेर धूम ठोकली.
साईट ऑफिसलाही विरोध
वाढवण बंदराच्या साईट उभारणीसाठी महसूल अधिकारी वासगाव येथील सर्व्हे क्रमांक 47 पैकी 1 या भूखंडावर आले. येथे साईट ऑफिस उभारता येईल का याची चाचणी ते करत होते. मात्र गावकऱ्यांनी तेथे धडक देत ही बैठकच हाणून पाडली. आम्ही बंदरविरोधात ठराव घेतले आहेत. त्यामुळे इथून निघून जा, असेही गावकऱ्यांनी त्यांना ठणकावून सांगितले.