कल्याणमध्ये ‘माज’दार विरुद्ध निष्ठावंत; तर पालघरमध्ये ‘मिस्टर इंडिया’ विरुद्ध ‘संघर्ष कन्या’ लढत

कल्याण हाही शिवसेनेचा बालेकिल्ला. या मतदारसंघात शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांची मिंधे गटाच्या श्रीकांत शिंदेंशी लढत आहे. या मतदारसंघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच एका महिलेला लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यातच एकनाथ शिंदे यांनी केलेल्या गद्दारीमुळे कल्याण लोकसभेतील शिवसेना आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पेटून उठले आहेत. कल्याण पूर्वमधील भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांचे आयुष्य आणि करीअर केवळ मिंधे गटामुळे बर्बाद झाल्याची संतप्त भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये खदखदत आहे.

श्रीकांत शिंदे यांच्या दबावतंत्रामुळे निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. त्याचवेळी कल्याण-डोंबिवलीतील भाजप कार्यकारिणीने श्रीकांत शिंदे यांचे काम न करण्याच्या ठरावाचे मेसेजही समाजमाध्यमांवरून फिरत आहेत. मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांना श्रीकांत शिंदे गटाने डोंबिवलीचा पाकीटमार म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देत राजू पाटील ‘माजदार’ तुम्ही काय होणार कल्याणचे ‘खासदार’ असे प्रत्युत्तर दिले होते. कल्याण, डोंबिवलीसाठी येणारा राज्य सरकारचा निधी हा श्रीकांत शिंदे यांच्यासाठी आणि त्यांच्या कंत्राटदारांसाठी बापाने दिलेला पॉकेटमनी आहे असेही राजू पाटील यांनी सुनावले होते. मनसेने पाठिंबा जाहीर केला असला तरी कल्याण-डोंबिवलीतील मनसे कार्यकर्ते मात्र राजू पाटील यांचा अवमान विसरणार नाहीत असे कार्यकर्ते खासगीत बोलत आहेत.

उल्हासनगर, कल्याण, बदलापूर, अंबरनाथमधील भाजप कार्यकर्तेही श्रीकांत शिंदेंच्या नव्हे तर शेजारच्या मतदारसंघातील कल्याण लोकसभेच्या कपिल पाटील यांच्या प्रचारात जात असल्याचे उघड चित्र दिसत आहे. याविरोधात शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर-राणे यांनी स्वच्छ प्रतिमा, दांडगा जनसंपर्क आणि नगरसेविका म्हणून केलेली लोकांची कामे या बळावर प्रचारात आघाडी घेतली आहे. कळवा, दिवा, मुंब्यापासून ते कल्याण-डोंबिवलीपर्यंत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उडवून दिलेली प्रचाराची राळ, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दरेकर यांच्यासाठी भरपावसात घेतलेली सभा चर्चेची ठरली होती. या निवडणुकीत मतदार गिअर बदलून दरेकर यांनाच विजयी करतील असा त्यांना विश्वास आहे.

पालघरमध्ये ‘मिस्टर इंडिया’ विरुद्ध ‘संघर्ष कन्या’ लढत

पालघरमध्ये शिवसेना महाविकास आघाडीच्या भारती कामडींविरुद्ध महायुतीचे हेमंत सवरा यांच्यात लडत होत आहे. आधी मिंधे गटाच्या आणि नंतर भाजपच्या वळचळणीला गेलेले खासदार राजेंद्र गावित हे लोकप्रतिनिधी म्हणून सपशेल अपयशी ठरले. त्यांच्या विरोधातच मिंधे गटाने आघाडी उघडल्याने भाजपने हा लोकसभा मतदारसंघ मिंध्यांकडून हिसकावून घेताना गावित यांना नारळ दिला. त्यामुळे अखेरच्या क्षणी हेमंत सवरा यांची उमेदवारी जाहीर झाली. सवरा राजकारणात सक्रियच नव्हते. वडील विष्णू सवरा पालकमंत्री असताना हेमंत सवरा यांनी जिल्ह्यात संपर्क ठेवला नाही. त्यामुळे ते कधीच मतदारसंघात दिसत नसल्याने भाजपने ‘मिस्टर इंडिया’ला उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे.

बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील हेही निवडणुकीच्या मैदानात आहेत. वसई, विरार, नालासोपाऱ्यातील मतांवर भिस्त असल्याचा दावा बविआचे पाटील यांच्याकडून केला जात आहे. त्यामुळे पालघरमध्ये तिरंगी लढत असली तरी मुकाबला भाजप आणि शिवसेनेतच असल्याचे बोलले जाते. पालघरमध्ये याही वेळी ‘शिट्टी’ वाजणार नाही अशी चर्चा आहे. याउलटभारती कामडी यांनी पहिल्यापासून अखेरच्या टप्प्यापर्यंत प्रचारात आघाडी घेतली. ‘संघर्षकन्या’ अशी त्यांची ओळख आहे. महाविकास आघाडीच्या कार्यकत्यांनी जंगलपट्टीपासून बंदरपट्टीपर्यंत एकजुटीने केलेला प्रचार ही त्यांच्या जमेची बाजू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दोन तडाखेबंद सभा, त्यांनी पालघरमधील विविध संघटना-सामाजिक संस्थांशी पाच तास साधलेला मॅरेथॉन संवाद आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा झंझावाती रोड शो यामुळे पालघरच्या प्रथम महिला खासदार लोकसभेत जातील असे चित्र आहे.