
वडिलांच्या मृत्यूनंतर मुलाने त्यांच्या खोलीतील संदूक उघडली. त्यात काही नाणे आणि तांब्याची गोलाकार वस्तू सापडली. या वस्तूचा इतिहास समोर आला अन सारेच अवाक झाले. ती साधारण वस्तू नसून चक्क राजमुद्रा निघाली. वाकाटक घराण्यातील शेवटचा राजा पृथ्वीसेन द्वितीय यांची ती राजमुद्रा होती. पाचव्या शतकातील वाकाटकांची ही राजमुद्रा चंद्रपूर जिल्हाच्या प्राचीन इतिहासात भर घालणारी ठरणार आहे. या राजमुद्रेवर राज्यलक्ष्मीचे चित्र अंकित असून ब्राम्ही लिपीत लेख कोरलेला आहे.
चंद्रपूर जिल्ह्याला प्राचीन इतिहास लाभला आहे. मौर्य, सातवाहन, ब्वाकाटक, हृहय, परमार, नाग, गोंड, भोसले राजांची येथे सत्ता होती. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात ऐतिहासिक ठेवा विखुरलेला आहे. भुगर्भात दडून बसलेला इतिहास आता उजेडात येत आहे.
गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या प्रकाश उराडे यांच्याकडे अतिशय महत्वाचा ऐतिहासिक ठेवा पडून होता. काही महिन्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर मुलगा रंजित उराडे यांने वडिलांच्या खोलीत असलेली जुनी संदूक उघडून पहिली. या संदूकात 60 ग्रम वजनाची, गोलाकार आकारातील ताब्यांची वस्तू सापडली. ही तांब्याची वस्तू 7 से.मी लांब, 3 से.मी. रूंदीची होती. त्यावर कमल पुष्पावर विराजमान असलेल्या देविचे चित्र अंकित आहे. त्या देविच्या उजव्या हातात कमलपुष्प आहे.
चित्राच्या खाली ब्राम्ही लिपीत लेख कोरलेला आहे. ही तांब्याची वस्तू महत्वाची वाटल्याने रंजित उराडे याने इतिहास अभ्यासक निलेश झाडे यांची भेट घेतली. झाडे यांनी याचे निरीक्षण केले. झाडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील इतिहास अभ्यासकांशी संपर्क साधत विचारपूस केली. पुणे येथील अमोल बनकर, अशोक सिंह ठाकूर यांनी तांब्याचा त्या गोलाकार वस्तूवर कोरलेल्या लेखाचे वाचन केले आणि एका महान सम्राटाचा इतिहास उजेडात आला.
वाकाटक राजा पृथ्वीसेन (द्वितीय)ची राजमुद्रा
उराडे यांनी जतन करून ठेवलेली ती वस्तू वाकाटक राजवंशातील शेवटचा राजा पृथ्वीसेन द्वितीय यांची राजमुद्रा आहे. पृथ्वीसेनाचा कालखंड इ. स. 475-495 होता. पृथ्वीसेन यांचे ताम्रपट बालाघाट, मांढळ, माहूरझरी येथे मिळाले आहेत. नागपूर जिल्ह्यातील नगरधन येथे वाकाटकांची राजधानी होती. पृथ्वीसेन द्वितीय यांची राजमुद्रा चंद्रपूर जिल्ह्यात सापडल्याने चंद्रपूरचा प्राचीन इतिहास मोठी भर पडली आहे.
काय आहे लेखात…
राजमुद्रेवर सुरुवातीला राज्यलक्ष्मीचे चित्र कोरले आहे. अश्याप्रकारचे चित्र गुप्त राजवटीतील सोन्यांच्या नाण्यावर अंकित असायचे. त्याखाली ब्राम्ही लिपीत लेख कोरला आहे. या लेखाचे वाचन पुणे येथिल इंडोलाॕजीस्ट अमोल बनकर, इतिहास अभ्यासक अशोक सिंह ठाकूर यांनी केले. लेखात “नरेंद्रषेण याचा पुत्र पृथ्वीषेणा यांची ही राजमुद्रा” असे लिहीले आहे.
“नरेन्द्रसेन-सत्सुनौ:_
भर्तुर व्व्वाकाटक श्रीय:-
प्रिथिविषेननृपते
जिगिशौर्ज्जयशासनं”




























































