
१७ कोटी रुपये किमतीच्या चांदीच्या विटा घेऊन जाणाऱ्या ब्रिक्स इंडिया कंपनीच्या व्हॅनला आज सकाळी साडेसहाच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. त्यात कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून व्हॅनचालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे काहीकाळ वाहतूककोंडी निर्माण झाली होती. सहाशे किलोच्या चांदीच्या विटा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून मूळ मालकाचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. चांदीच्या विटांच्या व्हॅनला अपघात झाल्याचे समजताच बघ्यांनी गर्दी केली. पण पोलिसांनी तातडीने धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.
ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची व्हॅन आज भायखळा येथून गुजरातमधील वापीकडे जाण्यासाठी पहाटेच्या सुमारास निघाली. त्यात गनमन एस. त्रिपाठी व आकाश जाधव हे त्यात होते. सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी चारोटी उड्डाणपुलावर व्हॅन येताच चालक सुभाष निकम यांचे नियंत्रण सुटले आणि ती डिव्हायडरवर चढली. त्याचवेळी गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरला व्हॅनची जोरदार धडक बसली. हा अपघात एवढा जबरदस्त होता की, व्हॅनमधील कर्मचारी त्रिपाठी व जाधव रक्ताच्या थारोळ्यात कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. चालक सुभाष निकम गंभीर जखमी झाला असून त्याला कासा येथील रुग्णालयात दाखल केले आहे.
२० विटा आणि लोडेड रिव्हॉल्व्हर
चारोटी पुलावर चांदी घेऊन जाणाऱ्या व्हॅनला मोठा अपघात झाल्याचे समजताच कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील तसेच मनोर पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी पवन ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली. चांदीच्या २० विटा व एक रिव्हॉल्व्हर जप्त केले असून अधिक तपास पोलीस करत आहेत. अपघात एवढा भयानक होता की, व्हॅनचा चक्काचूर झाला. तसेच ट्रेलरचेही अतोनात नुकसान झाले आहे.






























































