वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या नियमाने प्रवाशांना भरली धडकी, कन्फर्म तिकीट रद्द केल्यास ‘नो रिफंड’

vande metro namo bharat rapid rail

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतीच लाँच झालेली बहुचर्चित वंदे भारत स्लीपर ट्रेनसंबंधी एक मोठी माहिती समोर आली आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनने प्रवास करणाऱया प्रवाशांना धडकी भरवणारा नियम आहे. जर एखाद्या प्रवाशाने कन्फर्म तिकीट ऐनवेळी रद्द केले तर त्या प्रवाशाला रिफंड मिळणार नाही. त्या प्रवाशाचे सर्व तिकिटाचे पैसे वाया जाणार असून रेल्वेच्या खात्यात जमा होणार आहेत. रेल्वेच्या या नियमामुळे प्रवाशांना धडकी भरली आहे.

जर एखाद्या प्रवाशाने वंदे भारत स्लीपर ट्रेनचे तिकीट खरेदी केले, ते तिकीट कन्फर्म असेल आणि दुसऱया मिनिटाला जर प्रवाशाला वाटले की, तिकीट रद्द करायचे आहे, तर त्या तिकिटातील 25 टक्के रक्कम ही कापली जाईल. जर ट्रेनच्या ठरलेल्या 72 तासांपासून 8 तासांपर्यंत जर तिकीट रद्द करण्यात आले, तर तिकिटाची किंमत 50 टक्के कापून उर्वरित रक्कम प्रवाशाला दिली जाईल. तसेच प्रवासाच्या 8 तासांआधी जर तिकीट रद्द करण्यात आले, तर प्रवाशांना कोणताही रिफंड मिळणार नाही. प्रवाशांचे सर्व तिकिटाचे पैसे वाया जाणार आहेत. या ट्रेनचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, या ट्रेनमध्ये केवळ कन्फर्म तिकीट जारी केली जातील. यात कोणत्याही प्रकारची वेटिंग लिस्ट किंवा आरएसी असणार नाही.

अन्य ट्रेनचे नियम या ट्रेनपेक्षा वेगळे आहेत. जर 48 तास आधी तिकीट रद्द केले तर फर्स्ट एसीसाठी 240 रुपये, सेपंड एसीसीठी 200 रुपये, थर्ड एसीसाठी 180 रुपये, स्लीपर क्लाससाठी 120 रुपये आणि सेपंड क्लाससाठी केवळ 60 रुपये तिकिटाच्या पैशांतून कापले जातात.

वंदे भारतचे तिकीट किती

सेमी हाय स्पीड वंदे भारत स्लीपर ट्रेनने प्रवास करण्यासाठी या ट्रेनमध्ये एपूण 16 कोच दिले आहेत. यात 1128 प्रवासी प्रवास करण्याची क्षमता आहे. या ट्रेनमध्ये एसी 3 टियरचे 11 कोच असून याचे भाडे 2 हजार 300 रुपये, एसी-2 साठी 4 कोच असून याचे भाडे 3 हजार रुपये, फर्स्ट एसीसाठी 1 कोच दिला असून याचे भाडे 3 हजार 600 रुपये ठरवण्यात आले आहे. या ट्रेनचे भाडे 400 किलोमीटर अंतराच्या आधारावर ठरवण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.