पालिकेच्या सर्व समित्यांमध्ये घुमणार ‘वंदे मातरम्‍’ चा जयघोष! पालिका आयुक्तांची मंजुरी

सर्व फोटो - संदीप पगडे

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढय़ात प्रेरणादायी ठरलेल्या आणि प्रखर राष्ट्राभिमान जागवणाऱ्य़ा ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताचा जयघोष आता मुंबई महानगरपालिकेच्या वैधानिक समित्या, प्रभाग समित्या आणि सर्व विशेष समित्यांमध्येही होणार आहे. पालिका आयुक्तांनी याबाबतच्या ठरावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे महासभेचे कामकाज सुरू होण्याआधी ज्याप्रमाणे ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन होते, त्याच धर्तीवर सर्व समित्यांमध्ये हे राष्ट्रीय गीत गायले जाईल. पालिका महासभेच्या अंतिम मंजुरीनंतर याची अंमलबजावणी होणार आहे.

देशप्रेम आणि देशभक्ती जागृत करणाऱ्य़ा ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताबरोबरच ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताबाबतही हिंदुस्थानींच्या मनात तितकेच अढळ स्थान आहे. बंकीमचंद्र चॅटर्जी लिखित या गीताला ‘राष्ट्रीय गीता’चा मान देण्यात आला आहे. देशाचे भविष्य असणाऱ्य़ा तरुण पिढीसह प्रत्येक नागरिकाच्या मनात राष्ट्रभावना जाज्वल्य करण्यामध्ये ‘वंदे मातरम’ राष्ट्रीय गीताचा मोठा वाटा आहे. या पार्श्वभूमीवर पालिका शाळांसह वैधानिक, प्रभाग आणि विशेष समित्यांमध्ये वंदे मातरम राष्ट्रीय गीत गावे अशी ठरावाची सूचना भाजपचे नगरसेवक संदीप पटेल यांनी मांडली होती. यानुसार पालिका शाळांमध्ये वंदे मातरम् नियमितपणे गायले जात आहे. आता सर्व समित्यांमध्ये वंदे मातरम  गाण्याच्या प्रस्तावालाही पालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी दिली आहे. त्यामुळे आगामी महासभेत या ठरावाला अंतिम मंजुरी मिळणार आहे. दरम्यान, महापालिका सभागृहाचे कामकाज सुरू होण्याआधी वंदे मातरम गीत नियमितपणे गायले जाते.  

प्रखर राष्ट्रनिष्ठा-राष्ट्रपेमाचे प्रतीक

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यलढय़ात अग्रस्थानी असणारे ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्रीय गीत प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि राष्ट्रप्रेमाचे प्रतिक आहे. विद्यार्थीं सुजाण, सुशिक्षित आणि कर्तव्यदक्ष नागरिक बनून शाळांमधून बाहेर पडावे म्हणून  पालिकेच्या शाळांमध्ये राष्ट्रगीत, प्रार्थना आणि प्रतिज्ञा, सुविचार, ठळक बातम्या, बोधपर गोष्टी अशा उपक्रमांबरोबच नियमितपणे ‘वंदे मातरम्’ गायले जाते. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रभक्तीचा तेजस्वी स्रोत असलेल ‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय गीत सर्व समित्यांचे कामकाज सुरू होण्यापूर्वी गायले जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या