आरक्षण देता की, खूर्च्या सोडता! वंजारी समाजाच्या वाढीव आरक्षणासाठी विराट मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील वंजारी समाजाला दोन टक्के आरक्षण असून वाढत्या लोकसंख्येमुळे आता या आरक्षणात वाढ करून दहा टक्के करावे, यासह अन्य मागण्यांसाठी आज बुधवारी जिल्हाभरातील वंजारी समाज बांधवांनी एकत्र येत बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढला. या मोर्चात हजारो लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरूवात झाली. ‘आरक्षण देता की, खूर्च्या सोडता’, ‘एकच मिशन, वंजारी आरक्षण’ या व अशा अनेक घोषणांचे फलक घेऊन समाज बांधवांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. मोर्चा दरम्यान पेठ बीड, बीड शहर, शिवाजीनगर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. सुभाष रोड, अण्णाभाऊ साठे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

vanjari

वंजारी समाजाची राज्यात 95 लाखांवर लोकसंख्या असल्याची नोंद आहे. सरकारने जनगणना करून वंजारी समाजाची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन वाढीव आरक्षण द्यावे, अशी समाज बांधवांची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. याच मागणीसाठी आज बुधवारी दुपारी बीडमध्ये वंजारी समाज वाढीव आरक्षणासाठी विराट मोर्चा काढण्यात आला. दरम्यान हा मोर्चा समाजाच्या हिताचा असून कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही अथवा कोणाच्याही विरोधात नाही, असे आरक्षण कृती समितीने नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. या मोर्चाच्या नियोजनार्थ जिल्हाभरात ठिकठिकाणी गेल्या महिनाभरापासून बैठका घेण्यात आल्या होत्या. या बैठकीतून समाज बांधवांनी एकत्र येत आज बीडमध्ये आपल्या मागण्या शासन दरबारी मांडल्या. हजारोंच्या संख्येने समाज बांधव या आंदोलनात सहभागी झाले.

टोपीतून आरक्षणाचा संदेश
वंजारी समाज वाढीव आरक्षणासाठी निघालेल्या विराट मोर्चात शहरी भागासह ग्रामीण भागातील ऊसतोड मजुरही मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चात प्रत्येकजण डोक्यावर पांढरी टोपी व त्यावर ‘एकच मिशन वंजारी आरक्षण’ असा संदेश देत चालत होते. याशिवाय भगवे ध्वज घेऊन वंजारी आरक्षणाचा मुद्दा मांडत होते.

विद्यार्थिनींनी केले नेतृत्व
साठे चौकातून मोर्चा शिवाजी चौकात आल्यानंतर मोर्चेऱ्यांनी काही मिनीटे छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या मांडून आरक्षणाच्या घोषणा दिल्या. त्यानंतर सर्व समाज बांधव शिवाजी चौकात एकवटल्यानंतर विद्यार्थीनींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांचे दर्शन घेत आरक्षणाच्या घोषणा देण्यात आल्या. मोर्चामध्ये आरक्षणाच्या घोषणा देतांनाच वाहनातील माईकवरून सूचनाही दिल्या जात होत्या.