नॅशनल पार्कात वनराणी पुन्हा धावणार!

बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला भेट देणाऱ्या पर्यटकांचा आनंद द्विगुणित होणार आहे. मागील चार वर्षे बंद असलेल्या ‘वनराणी’ टॉय ट्रेनची सेवा लवकरच सुरू होणार आहे. व्हिस्टाडोमसह नव्या रंगात व नव्या रुपात ‘वनराणी’ पुनरागमन करणार आहे.

2021 मध्ये ‘तौत्ते’ चक्रीवादळात टॉय ट्रेनचे ट्रक खराब झाले होते. तेव्हापासून टॉय ट्रेन बंद आहे. सतत पाठपुरावा केल्यानंतर अखेर पर्यटकांची लाडकी ‘वनराणी’ आता पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. सध्या या ट्रेनच्या चाचणी फेऱ्या सुरू आहेत. त्या फेऱ्या यशस्वी झाल्यानंतर लगेचच टॉय ट्रेन पर्यटकांच्या सेवेत दाखल केली जाईल, अशी माहिती संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

मेट्रोसारखी आसने, पारदर्शक छत

पर्यटकांच्या सेवेत नव्याने दाखल होणाऱ्या टॉय ट्रेनचे रुपडे पूर्णपणे बदलले आहे. आधुनिक तंत्रज्ञान व पर्यावरणपूरक डिझाईनच्या टॉय ट्रेनला पारदर्शक छत, मोठय़ा काचा तसेच आतील भागात मेट्रो ट्रेनसारखी आसने आहेत. तसेच आकर्षक रंगसंगतीमुळे ‘वनराणी’चे सौंदर्य आणखी खुललेले आहे. डब्यांवर उद्यानातील प्राणी आणि निसर्गाची चित्रे रंगवली आहेत.