
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 23 जानेवारी रोजी असलेल्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
19 जानेवारीपासून अंधेरी महोत्सव
शिवसेना अंधेरी पश्चिम विधानसभातर्फे 19 ते 28 जानेवारी या कालावधीमध्ये अंधेरी पश्चिम डी. एन. नगर येथील महात्मा फुले क्रीडांगण (प्रगत मैदान) येथे ‘अंधेरी महोत्सव 2024’ चे आयोजन केले आहे. अंधेरी पश्चिमचे विधानसभा संघटक संजय मानाजी कदम आणि विधानसभा समन्वयक सुनील खाबिया जैन यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्त अंधेरीतील क्रिकेट संघासाठी 19 ते 21 जानेवारी रोजी ‘कार्यसम्राट चषक’ क्रिकेट स्पर्धा, 21 जानेवारीला सकाळी 7 वाजता जुहू समुद्रकिनाऱयावर इर्ला लेन येथे ‘वॉक फॉर हिंदुहृदयसम्राट-बीच वॉकथॉन’, 24 जानेवारीला ‘अंधेरी श्री’ ही शरीरसौष्ठव स्पर्धा, 25 जानेवारीला फुटबॉल स्पर्धा, 26 जानेवारीला महिलांसाठी मैदानी खेळ व हळदीकुंकू समारंभ, 27 जानेवारीला एकेरी व समूह नृत्य स्पर्धा व ‘अंधेरी गॉट टॅलेंट’, 28 जानेवारीला ‘अंधेरी गौरव सन्मान सोहळा’ असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. तसेच प्रत्येक स्पर्धेसाठी आकर्षक व रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
शिवडीत आजपासून भगवा चषक
बालविकास मित्र मंडळ व सिद्धी संस्कृती फाऊंडेशनच्यावतीने भगवा चषकाचे आयोजन केले आहे. शिवडीतील रामटेकडी बाल विकास मनोरंजन मैदानात 17 ते 28 जानेवारीला संध्याकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत होणाऱया महोत्सवात कला, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी दिली.
ताडदेवमध्ये रविवारी रक्तदान शिबीर
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतिनिमित्त ताडदेवमध्ये जय भवानी प्रतिष्ठान आणि शिवसेना शाखा क्रमांक 215 च्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, 21 जानेवारीला सकाळी भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. दुपारी 4 वाजता महिलांसाठी स्नेहमिलन आणि हळदीकूंकूचे आयोजन करण्यात आले आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना तज्ञांचे मोफत मार्गदर्शन मिळावे, यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपनेते, कोल्हापूर-सिंधुदुर्गचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिली. कार्यक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख सिद्धेश माणगावकर, विभाग अधिकारी हेमंत दुधवडकर, शाखा संघटिका सुप्रिया शेडेकर यांनी केले आहे.





























































