
सामना प्रतिनिधी, मुंबई
4733 मालमत्तांपैकी फक्त 708 मालमत्ता पालिकेच्या नावावर असून तब्बल 2377 मालमत्ता नावावरच नसल्याचे समोर आले आहे. यातील 1713 मालमत्ता नावावर करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर 664 मालमत्तांबाबत कोणताच निर्णय झालेला नाही. नवनियुक्त सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी आज ही माहिती दिली.
मालमत्ता नावावर नसल्याने महसूल बुडत असून त्या नावावर करण्यासाठी कार्यवाही करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. विकास नियोजन विभागातील 259 मालमत्ता नावावर होणे बाकी असून 192 प्रकरणांत जिल्हाधिकाऱयांकडे कागदपत्रे सादर करण्यात आली तर मालमत्ता विभागाच्या 1713 मालमत्तांबाबत भूमी अभिलेख खात्याकडे कागदपत्रे सादर करण्यात आल्याची माहितीही परब त्यांनी दिली.
… तरच पाणीचोरीला आळा बसेल!
2014 पासून प्लॅस्टिकच्या पाइपमधून पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर मोठय़ा प्रमाणात पाइप फोडून बेकायदेशीरपणे कनेक्शन घेण्याचे प्रकार वाढल्याचे परब यांनी सांगितले. या पाणीचोरीला आळा घालण्यासाठी चोरीची तपासणी करून अशी कनेक्शन्स चारपट दंड आकारून नियमित करावी, जेणेकरून पाणीचोरीला आळा बसेल आणि पर्यायाने पालिकेचा बुडत असलेला महसूलही वाढेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.




























































