राज्यात वारकरी विद्यापीठ होणारच! शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांची ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातशे वर्षांची परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायामध्ये केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देण्याची ताकद आहे. त्यामुळे हा वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे चालू राहावा, भावी पिढीला त्याचे ज्ञान मिळावे, अध्यात्माची ताकद कळावी म्हणून राज्यात वारकरी विद्यापीठ होणारच, अशी ग्वाही शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी दिली. त्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री वारकरी प्रबोधन महासमितीच्या वतीने रविवारी श्री पांडुरंगाचा भव्य पालखी सोहळा आणि संतसंमेलनाचे आयोजन वडाळ्याच्या फाईव्ह गार्डन येथे केले होते त्यावेळी खासदार संजय राऊत बोलत होते. संमेलनाच्या सुरुवातीलाच श्री वारकरी प्रबोधन महासमितीचे अध्यक्ष हभप रामेश्वर महाराज शास्त्री यांनी राज्यात वारकरी विद्यापीठ सुरू करावे अशी मागणी केली आहे. तोच धागा पकडून संजय राऊत म्हणाले की, आज राज्यात वारकर्‍यांच्या आशीर्वादानेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. त्यामुळे त्यांची विद्यापीठ उभारण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच संतसंमेलनाला सरकारकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून प्रयत्न करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. तसेच हिंदुत्व आणि अध्यात्माचा खरा प्रचारक वारकरी संप्रदाय असल्याने तो वाढला पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी हभप रामचंद्र महाराज पेनुरे, अशोक महाराज गमरे गुरुजी, तनपुरे गुरुजी, श्रीराम महाराज जोशी, गोकूळ शेठ घोलप, माजी महापौर श्रद्धा जाधव, महासमितीचे अध्यक्ष रामेश्वर महाराज शास्त्री, सचिव नानासाहेब निकम, उपाध्यक्ष अशोक महाराज सूर्यवंशी, बळवंत महाराज आवटे, शामसुंदर सोन्नर, मनोज पुंडे, दैनिक ‘सामना’चे नॅशनल हेड (विपणन विकास) दीपक शिंदे आदी उपस्थित होते.

दैनिक ‘सामना’च्या समाजप्रबोधन पुरस्काराने श्रीराम महाराज जोशी यांचा सन्मान

दैनिक ‘सामना’च्या वतीने देण्यात येणारा समाजप्रबोधन पुरस्कार शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या हस्ते हभप श्रीराम महाराज जोशी यांना देण्यात आला. वारकरी प्रबोधन महासमितीच्या वतीने दिला जाणारा ‘वारकरी रत्न’ पुरस्कार हभप मारोती महाराज थोरात यांना (मरणोत्तर) प्रदान करण्यात आला. तर ‘श्री संत हैबतीबाबा वारकरी सेवा भूषण’ पुरस्कार निष्काम कर्मयोगी हभप शिवराम महाराज म्हसकर यांना देण्यात आला. तसेच ‘वारकरी विशेष पुरस्कारा’ने सुरेश महाराज साळुंखे आणि आनंदराव गोळे यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी पालखी सोहळा आणि संतसंमेलनाच्या 20 वर्षे पूर्तीनिमित्त संजय घावरे यांनी तयार केलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.