
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड कोरोना पॉझिटिव्ह आल्या असून त्यांनी आज ट्विट करत ही माहिती दिली. सोमवारी संध्याकाळी मला कोरोनाची काही लक्षणे दिसू लागली. त्यामुळे चाचणी केली. आज माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. मी स्वतःला आयसोलेट केले असून माझी प्रकृती चांगली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने काळजी घ्यावी, तपासणी करावी, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
मुंबईचे टेन्शन वाढले, दिवसभरात 1377 कोरोनाबाधित
मुंबईत पूर्ण आटोक्यात आलेला कोरोना पुन्हा एकदा झपाटय़ाने वाढू लागला असून दिवसभरात तब्बल 1377 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईचे टेन्शन पुन्हा एकदा वाढले आहे. मुंबईत गेल्या चार दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होत असून मंगळवारी तब्बल 1,377 नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7, 73,298 वर पोहोचली आहे. तर दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 16,374 वर पोहोचली आहे. दरम्यान, मंगळवारी 338 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत 7,48,537 रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे.





























































