
बॉलीवूड अभिनेता वरुण धवन याने ‘बॉर्डर-2’ चित्रपटामध्ये साकारलेल्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले. आताही तो अनेक बिग बजेट चित्रपटांमध्ये काम करत असून लवकरच हे चित्रपट प्रदर्शित होतील. व्यवसायिक आयुष्य भरात असताना वरुण वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. वरुणची पत्नी नताशा दलाल हिने 2024 मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला. दोघांनी मोठ्या प्रेमाने तिचे नाव लारा असे ठेवले. मात्र जन्मानंतर आपल्या लेकीला डेव्हलपमेंटल डिसप्लेसिया ऑफ द हिप या आजाराचे निदान झाले होते, असे वरुणने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले.
लारा जेव्हा दीड वर्षांची होती, तेव्हा तिला चालताना आणि धावताना त्रास होत असल्याचे आमच्या लक्षात आले. तपासणीअंती तिला डीडीएच हा आजार असल्याचे समजले. या आजारात खुब्याचे हाड सॉकेटमधून बाहेर सरकते. ज्यामुळे एक पाय दुसऱ्यापेक्षा लहान होतो आणि मूल लंगडत चालते. या आजारामुळे लवकर आर्थरायटिस किंवा स्लिप डिस्कचा धोका असतो. आपल्या देशात याबद्दल अजूनही पुरेशी जागरूकता नाही, असे वरुण म्हणाला.
लारावर उपचार करण्यासाठी तिला शस्त्रक्रियेची गरज भासली नाही, मात्र एका विशिष्ट प्रक्रियेद्वारे तिचे हाड जागेवर बसवण्यात आले. यानंतर तिला अडीच महिने स्पायका कास्टमध्ये राहावे लागले. तिला भूल देऊन तो कास्ट लावण्यात आला आणि जेव्हा तिला जाग आली, तेव्हा ती पूर्णपणे प्लास्टरमध्ये होती. तो काळ आमच्यासाठी अत्यंत कठीण होता, असे सांगताना वरुण भावूक झाला. यावेळी वरुणने इतर पालकांनाही मुलांच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष देण्याचे आवाहन केले.
मुलांच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष द्या. जर मुलाच्या चालण्यात काही वेगळेपणा वाटला, तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. लवकर निदान झाल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, असे वरुण म्हणाला. तसेच या विषयावर आपल्याला एक पुस्तकही लिहायचे आहे. जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल, असेही वरुण म्हणाला. तसेच मला कुणाची सहानुभूती नको आहे. फक्त लोकांमध्ये या आजाराबाबत जागरूकता निर्माण व्हावी, याच उद्देशाने त्याने ही माहिती शेअर केली आहे, असे तो म्हणाला.





























































