विरार-वसईत प्रचाराचा नारळ फुटला, महापालिकेवर शिवसेनेचा ठसा उमटवणारच

वसई-विरार महापालिकेवर शिवसेनेचा ठसा उमटवणारच असा वज्रनिर्धार आज शिवसैनिकांनी केला. शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ शिवसेना संपर्कप्रमुख, आमदार विलास पोतनीस यांच्या हस्ते नवघर पूर्व अंबेमाता मंदिराजवळील प्रभाग २२ मध्ये आज वाढवण्यात आला. यावेळी भगव्याचे शिलेदार महापालिकेत मोठ्या दिमाखात जातील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

वसई-विरार महापालिका निवडणुकीत ११५ जागांपैकी ८९ जागांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्वबळावर लढत आहे. या सर्व जागांवर विजयी होणारच, असा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्याने आज वसई-विरारमध्ये शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ फुटला. भूषण वैती, सीमा किल्लेदार, प्रियंका सकपाळ आणि विशाल रहाळ या प्रभाग २२ मधील शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार दणक्यात सुरू झाला.

यावेळी पालघर लोकसभा संघटक जनार्दन पाटील, जिल्हाप्रमुख प्रवीण म्हाप्रळकर, जिल्हा संघटक किरण चेंदवणकर, जिव्हा सचिव राजाराम बाबर, माजी विरोधी पक्षनेते विनायक निकम, विधानसभा संघटक शशीभूषण शर्मा, शहरप्रमुख संजय गुरव, अजित वैती, उदय चेंदवणकर, शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, माथाडी मुकादम व प्रभागातील स्थानिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.