एपीएमसीचा जीव अडकला बाजार फीमध्ये, नियोजन शुन्य कारभारामुळे विनाकारण गर्दी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फळ आणि भाजीपाला मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने केलेले नियोजन आज पूर्णपणे कुचकामी ठरले. त्यामुळे कारण नसतानाही मार्केटमध्ये गर्दी झाली. या आणीबाणीच्या प्रसंगी एपीएमसीचा जीव बाजार फीमध्ये अडकल्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या. एपीएमसीच्या प्रवेशद्वारांवर मोठी वाहतूक कोंडी झाली. अपु-या सुरक्षा रक्षकांमुळे गर्दीवर नियंत्रण मिळविणे अवघड झाले.

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट सुरु ठेवण्याचा निर्णय काल कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी घेतला. त्यानुसार एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमध्ये आज ५३० गाड्यांची आवक झाली. मात्र प्रशासनाने मार्केटमध्ये येणा-या गाड्यांसाठी एक आणि ग्राहकांसाठी एक असे दोनच प्रवेशद्वार उघडे ठेवल्यामुळे एकच गोंधळ उडाला. नेहमी पेक्षा ग्राहकांची संख्या आज कमी होती, तरीही मार्केटमध्ये गर्दी झाली. या आणीबाणीच्या प्रसंगी प्रशासनाने बाजार फी घेणे चालूच ठेवले. परिणामी मार्केट मधून बाहेर जाणा-या गाड्या दोन ते तीन तास रांगेत अडकून पडल्या. इतकी मोठी रांग लागल्यामुळे अनेक वाहन चालकांनी भाजीपाला भरण्यास नकार दिला. एपीएमसीचे संचालक शंकर पिंगळे यांनी शेवटी प्रशासनाला बाजार फी न घेण्याच्या सुचना केल्या. त्यानंतर गर्दी कमी झाली.

मार्केटमध्ये सुरक्षा रक्षक कमी
ग्राहकांना आवरण्यासाठी एपीएमसी प्रशासनाने जास्त सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे आवश्यक होते. मात्र प्रशासन फक्त नेहमीच्या सुरक्षा रक्षकांवर अवलंबून राहिले. सर्वच गेट खुल्ले ठेवून प्रत्येक ठिकाणी सॅनिटायझरीची व्यवस्था केली असती, तर ग्राहक माल खरेदीकरुन लगेच बाहेर पडले असते आणि गर्दी झाली नसती, असे भाजीपाला मार्वेâटमधील व्यापारी गणेश पावगे यांनी सांगितले.

मार्केटची वेळ वाढविणार
मार्केटमध्ये आज इतक्या गाड्यांची आवक होईल हे अपेक्षीत नव्हते. मार्केट लवकर सुरू करू वेळ वाढविण्यासाठी विचारविनिमय सुरू आहे. जोपर्यंत लॉकडाऊन आहे, तो पर्यंत प्रशासनाने बाजार फी घेऊ नये. शासन, मार्केट प्रशासन आणि व्यापारी यांची एक समन्वय समिती तयार करण्यात यावी. प्रशासनाने भाजीपाला मार्केट मध्ये कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया एपीएमसीचे संचालक शंकर पिंगळे यांनी व्यक्त केली आहे.