
>> द्वारकानाथ संझगिरी
वासू परांजपेच्या मृत्यूबरोबर एक पर्व संपलं. पर्व हा मोठा शब्द मी जबाबदारीने वापरतोय. एक क्रिकेटपटू, पंच, कोच आणि गप्पिष्ट क्रिकेटरसिक म्हणून त्याने जगाला आनंद वाटला. वासूकडे कुणी गप्पा मारायला गेला आणि छान आनंदी, हसत परतला नाही असा मला माणूस माहीत नाही.
क्रिकेटपटू म्हणून तो मैदानावर देखणा दिसायचा. त्याच्या लाडक्या सर फ्रँक वॉरेलची प्रतिमा त्याच्या मनात कुठे तरी असावी. आणि ती त्याच्या मैदानावरच्या वावरातून व्यक्त होत असेल.
एक क्रिकेटपटू म्हणून तो नेहमी त्या काळातल्या ऑस्ट्रेलियन संघासारखा फक्त आक्रमकच विचार करायचा. बचावाचा विचार त्याच्या मनाला फार क्वचित शिवायचा. वासू ज्या काळात खेळायचा त्या काळात क्षेत्ररक्षण हा अनेक क्रिकेटपटूंनी ऑप्शनला टाकलेला विषय होता. पण वासूला क्षेत्ररक्षण करताना पाहणं हा नयनरम्य अनुभव होता. त्याला कुणी स्टाइल आयकॉन म्हटलं नाही, पण त्याचा तो गळय़ातला रुमाल, डोक्यावरची टोपी वासू घालतो म्हणून मैदानात अनेक जण घालत. दादर युनियनचं नेतृत्व त्याने अनेक वर्षे केलं. सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकरसारख्या पुढे महान झालेल्या खेळाडूंवर खेळता खेळता संस्कार केले. तो दादर युनियनचा उत्कर्ष काळ ठरला.
वासू प्रशिक्षक म्हणून क्रिकेटपटू वासूपेक्षा खूप मोठा होता. दिलीप वेंगसरकरवर त्याने पोरासारखे प्रेम केले. वासू का कदाचित त्या थोडय़ा मंडळींपैकी एक असेल की, जो एवढय़ा मोठय़ा सुनीललाही क्रिकेटमधल्या चार गोष्टी सांगू शकायचा. सचिन तेंडुलकरवर त्याचं पोटच्या पोरासारखं प्रेम होतं. त्याने कधी ना कधी ज्या मोठय़ा क्रिकेटपटूंवर संस्कार केले ती यादी खूप मोठी आहे. ती सुनील गावसकरपासून सुरू होते आणि सनथ जयसूर्या, रोशन महानामा, रोहित शर्मापर्यंत येते.
क्रिकेट हा त्याचा श्वास होता. क्रिकेटचा इतिहास, त्यातले किस्से त्याला मुखोद्गत होते. क्रिकेटच्या इतिहासातून कसं शिकावं हे तो फार उत्तम सांगायचा. वासूशी गप्पा मारायच्या आहेत म्हटल्यानंतर मला तिथल्या तिथे आनंद व्हायचा, कारण त्याच्याशी गप्पा मारणे हा एक इव्हेण्ट असायचा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे की, तो माणूस म्हणून अनेक मोठमोठय़ा क्रिकेटपटूंपेक्षा उत्तुंग होता.
कुणाबद्दल असूया नाही. मागे वाईट बोलणं नाही. कसलीच अपेक्षा नाही. आणि उपेक्षा झाली म्हणून रडणं नाही. त्याने जो जो त्याच्या सानिध्यात आला म्हणजे क्लब क्रिकेटपासून माझ्यासारख्या त्याच्या मित्रापर्यंत त्याला त्याने आनंदच वाटला. वासूशी गप्पा मारून निघताना मी बराच वेळेला माझं स्ट्रेस पूर्णपणे विसरून जायचो. तो मस्त आयुष्य जगला. प्रचंड काwटुंबिक सुख सौख्य त्याला मिळालं. आणि समाधानी मनाने त्याने निरोप घेतला. आम्ही मात्र असमाधानी आहोत. आम्हाला अजून वासू हवा होता. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीला अंत हा असतोच. वासू नसल्याची पोकळी आम्हाला सदैव जाणवेल. पण स्वर्गातले क्रिकेटपटू खूश असतील. त्यांना आता वासूकडून किस्से ऐकायला मिळतील.



























































