अबब…! 14 देशांतून केली 29 हजार कि.मी.ची सायकलवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पुणे 

पुण्याच्या 20 वर्षीय वेदांगी कुलकर्णीने तब्बल 14 देशांमधून सायकलने प्रवास करण्याचा पराक्रम केलाय. तिने रविवारी सकाळी कोलकात्यामध्ये पोहोचून 29 हजार किलोमीटरचा आपला सायकल प्रवास पूर्ण केला. सायकलवर जगाची सफर करणारी वेदांगी ही आशिया उपखंडातील सर्वात वेगवान महिला बनली आहे.

वेदांगीने ऑस्ट्रेलियातील पर्थ शहरातून जुलैमध्ये आपल्या सायकल प्रवासास प्रारंभ केला होता. तिने रोज 300 किलोमीटर प्रवास करून 159 दिवसांत सायकल भ्रमंती पूर्ण केली. जागतिक पातळीवर हा विक्रम इंग्लंडच्या जेनी ग्राहमच्या नावावर आहे. तिने याच वर्षी 124 दिवसांत ही मोहीम फत्ते केली होती. आता वेदांगी विमानाने पुन्हा पर्थला जाणार असून तेथे आपल्या विक्रमाची नोंद करणार आहे.

80 टक्के सायकल प्रवास एकटीनेच केला!
‘या सायकल प्रवासात मला अनेक चांगले-वाईट अनुभव आले. जवळपास 80 टक्के प्रवास मी एकटीनेच केला. कॅनडामध्ये सायकलवर प्रवास करत असताना एक अस्वल माझ्या पाठीमागे लागले होते. स्पेनमध्ये तर चाकूचा धाक दाखवून मला लुटण्यात आले. याचबरोबर रशियात बर्फाच्छादित भागात मला एकटीलाच काही रात्री घालवाव्या लागल्या. संपूर्ण प्रवासादरम्यान -20 डिग्री ते 37 डिग्री सेल्सियस अशा विविध तापमानाचाही मला सामना करावा लागला.’
-वेदांगी कुलकर्णी