
कोविडच्या महामारीमुळे मार्च 2020 मध्ये देशभरासह मुंबईत लॉकडाऊन लागू होऊन वाहतुकीवर मोठय़ा प्रमाणावर निर्बंध आले. त्यामुळे मुंबईतील वाहन अपघातात कमालीची घट झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. मात्र वर्षअखेर निर्बंध कमी झाल्यानंतर पुन्हा रस्ते अपघातांत वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. या अपघातात एकूण 350 जणांनी आपला जीव गमावला. भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्याने हे अपघात घडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
कोरोनाच्या साथीमुळे मार्च 2020 मध्ये देशव्यापी लॉकडाऊन लागू झाल्याने मुंबईतील वाहन अपघातांच्या संख्येवर त्याचा परिणाम झाला आहे. साल 2010 पासून रस्ते अपघातांचा आलेख घटत जात असून 2020 मध्येही अपघात घटले आहेत. 2020 वर्षी अपघातांचे प्रमाण कमी होण्यामागे लॉकडाऊनचादेखील हातभार लागला आहे. या वर्षी 338 प्राणघातक अपघाताच्या घटना घडल्या असून त्यात 350 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक हजार 388 अपघातांमध्ये एक हजार 740 जण जखमी झाले. साल 2019 च्या तुलनेत साल 2020 मध्ये अपघातांचे प्रमाण 20 टक्क्यांनी घटले आहे. 2020 मधील प्राणघातक रस्ते अपघातातील 42 टक्के अपघात हे ‘हिट ऍण्ड रन’ प्रकारचे होते. या अपघातात 75 टक्के लोकांची प्राणहानी होऊन त्यांनी आपला जीव गमावला. सालाबादप्रमाणे ‘ब्लुमबर्ग फिलॅनर्थोपिस’ या संस्थेने 2020 या वर्षातील मुंबईतील वाहन अपघात, त्याची कारणे आणि अपघातांचे ‘ब्लॅकस्पॉट’ याचा एक अहवाल तयार केला असून त्यात प्राणघातक आणि विनाप्राणघातक अपघातांचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. वाहतूक विभागाचे सहआयुक्त राजवर्धन सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
धोकादायक ठिकाणे ः घाटकोपर–माहुल मार्ग, घाटकोपर उड्डाणपूल, आशा नगररोड याठिकाणी सर्वाधिक अपघाती मृत्यू झाले. तर अमर महाल जंक्शन, गोदरेज जंक्शन आणि पूर्व द्रुतगती मार्ग या ठिकाणी सर्वाधिक प्राणघातक अपघात व जखमी झाले.
































































