कोंढव्यात अल्पवयीन मुलावर कोयत्याने हल्ला करत वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून परिसरातील 8 वाहनांची तोडफोड करणाऱ्या पाचजणांना कोंढवा पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली आहे. ही घटना दोन दिवसांपुर्वी कोंढवा-बुद्रुक परिसरातील श्रद्धानगरमध्ये घडली होती. सुरज यादवराव रसाळ (वय 19 रा. उंड्री), स्वप्नील उर्फ अनिकेत नितीन कणसे (वय 19, रा. कोंढवा बुद्रूक), ओमकार सचिन शेंडगे (वय 19, रा. होळकरवाडी), नितीन एकनाथ पाटील (वय 20, रा. उंड्री), किरण नामदेव जाधव (वय 19, रा. मरळचाळ, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी प्रेम यादव यांनी तक्रार दिली आहे.

तक्रारदार प्रेम आणि आरोपी सुरज यांची शाळेत असल्यापासून भांडणे आहेत. त्याचा राग मनामध्ये धरून आरोपींनी 12 जूनला प्रेमचा दुचाकीवर पाठलाग केला. त्यावेळी पावसाचे पाणी प्रेमच्या अंगावर उडाल्यामुळे त्याने जाब विचारला. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने प्रेमवर कोयत्यासह तलवारीने मारहाण करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर प्रेम त्याठिकाणाहून निघून घरी गेला. आरोपींनी मरळचाळ परिसरात जात 8 वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली.

शाळेत असल्यापासून तक्रारदार आणि आरोपी यांच्यामध्ये वादावादी होत होती. त्याचा राग मनामध्ये धरून आरोपींनी प्रेम यादव याच्यावर हल्ला करून परिसरातील वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी पाचही आरोपींना चार तासामध्ये अटक करण्यात आली आहे.
-स्वराज्य पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस ठाणे