वेळास येथे समुद्रात झेपावली कासवाची 26 पिल्ले; या हंगामातील पहिली घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात कासवांचे गाव म्हणून वेळास या गावाची ओळख आहे. ही ओळख गुरुवारी पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे. या वर्षीच्या कासवाच्या विणीच्या हंगामात पहिल्यांदा वेळास येथून कासवांची 26 पिल्ले समुद्राकडे झेपावली आहेत. या हंगामात 15 नोव्हेंबर 2022 रोजी मंडणगड तालूक्यातील वेळास येथील समुद्रकिनारी वाळुमध्ये ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या कासव मादीने पहिले घरटे तयार केले होते. या घरट्यांमध्ये ऑलिव्ह रिडले मादींच्या कासवांची 102 अंडी सुरक्षित करण्यात आली होती. या सुरक्षीत केलेल्या अंडयामधून 26 कासवाची पिल्ले (ऑलिव्ह रिडले) सुरक्षितपणे समुद्रामध्ये गुरूवारी सोडण्यात आली. वेळासमध्ये या हंगामात पहिल्यांदाच ही घटना घडल्याने कासवमित्र, वनकर्मचारी व वन्यप्राणीमित्रांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या हंगामातील वेळास येथील कासव मादीचे हे पहिलेच घरटे होते.

गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यामधील समुद्रकिनारी एकूण 14 हॅचरीमधुन ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवांचे संरक्षण व संवर्धन करण्यात आले. त्यात एकूण 317 घरटे मिळाली होती. त्यात 33, 609 अंडी होती. त्या घरट्यांचे व अंडयाचे वनविभाग आणि कासव मित्रांनी संरक्षण आणि संवर्धन केले. त्यानंतर त्यातून 12,014 इतकी ऑलिव्ह रिडले समुद्रकासवांची पिल्ले समुद्रामध्ये सोडण्यात आली होती.

15 नोव्हेंबर 2022 रोजी वेळासमध्ये ऑलिव्ह रिडले जातीच्या मादीने घरट्यात 102 अंडी घातलेली होती. त्यामधून 26 कासवाची पिल्ले बाहेर पडली. यंदाच्या कासवांच्या विणीच्या हंगामात कासवांच्या घरट्यांचे आणि अंडयांचे संवर्धन करणाऱ्या कासवमित्रांची मार्गदर्शनपर कार्यशाळा दापोली येथे झाली. या ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरटयांची नोंद एम टर्टल अॅपमध्ये होणार आहे.

कासव संवर्धन मोहीमेमध्ये विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण) दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक रत्नागिरी (चिपळूण) सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव बोराटे, परिक्षेत्र वनअधिकारी (दापोली) अनिल दळवी, वनपाल मंडणगड, सुनिल पाटील, संयुक्त वन व्यवस्थापन, धनश्री काते अध्यक्ष होम स्टे संघटना, देवेंद्र पाटील कासवमित्र यांच्या उपस्थितीखाली 26 कासव पिल्लांना सुरक्षितरित्या समुद्रात सोडण्यात आले.

वेळासच्या निसर्गरम्य आणि शांत समुद्र किनाऱ्यावर थंडीच्या शेवटी आणि उन्हाळयात रिडले टर्टल या महाकाय समुद्री कासवांची वीण होते. आजही दुर्दैवाने जिभेचे चोचले पुरवण्यासाठी या कासवांची आणि त्यांच्या अंड्यांची हत्या होते. या कासवांच्या सुरक्षिततेसाठी अनेक निसर्गप्रेमी संस्था कार्यरत आहेत. अशा मोहिमेला चांगले यश मिळत कासवांची घरटी संरक्षित करण्यात येत आहेत. आता वेळास येथे या हंगामातील पहिली कासवांची 26 पिल्ले समुद्रात झेपावली आहेत.