
ज्येष्ठ नाट्य-चित्रपट दिग्दर्शक, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील एक अग्रणी, चित्रकार, साहित्यिक, विद्यार्थीप्रिय शिक्षक, कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत दत्तात्रय जोशी (वय 77) यांचे सोमवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. प्रसिद्ध अभिनेते ऋषीकेश जोशी यांचे ते वडील होत.
शाहू स्मारक भवन येथे सुरू असलेल्या सुमित्रा भावे स्मृती महोत्सवात व्यस्त असतानाच चंद्रकांत जोशी यांना रविवारी अचानक रक्तदाबाचा त्रास झाला. चक्कर आल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र ‘ब्रेन डेड’ झाल्याने ते कोमात गेल्याचे सांगण्यात येत होते. ‘सूत्रधार’ या हिंदी व ‘टक्कर’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. कला शिक्षक म्हणून त्यांनी 40 वर्षांहून अधिक काळ सेवा केली आहे. शिवाजी विद्यापीठ संगीत, नाट्यशास्त्र विभागाचे समन्वयक म्हणूनही त्यांनी काम केले तसेच कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची संकल्पना त्यांनी रुजविली. त्यांच्या निधनाने कला क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
























































