कुशल नेते, प्रभावी वत्ते, यशस्वी उद्योजक, जाणते क्रिकेट प्रशासक आणि साक्षेपी संसदपटू असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व लाभलेले महाराष्ट्राचे पहिले बिगर काँग्रेसी मुख्यमंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी अर्थात सर्वांचे लाडके ‘सर’ आज पंचत्वात विलीन झाले. हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान पहाटे तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील श्रद्धा आणि निष्ठेचा कोहिनूर हरपला, अशी भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. नगरसेवक पदापासून लोकसभेच्या अध्यक्ष पदापर्यंत अनेक मानाची पदे त्यांनी प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत भूषविली. शिस्तप्रियता आणि वक्तशीरपणासाठी ते कायमच स्मरणात राहतील. त्यांच्या जाण्याने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशाने एक सुसंस्कृत नेतृत्व गमावले आहे. शिवसेनेच्या सोनेरी इतिहासाचा साक्षीदार स्वर्गस्थ झाला.
मनोहर जोशी यांना अस्वस्थ वाटू लागल्याने बुधवारी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाले. त्यानंतर अतिदक्षता विभागात तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथे त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि आज पहाटे 3 वाजून 2 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा उन्मेष, अस्मिता व्यास आणि नम्रता वाघ या दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
पंतप्रधानांना दुःख
जनसेवेत दीर्घकाळ व्यतीत करणाऱया या ज्येष्ठ नेत्याने विविध जबाबदाऱयांसाठी योगदान दिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अविश्रांत काम केले. केंद्रीय मंत्री म्हणूनही त्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिली. लोकसभेच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांनी संसदीय कामकाज प्रक्रिया अधिक समावेशक आणि गतिमान केली. एक कर्मठ लोकप्रतिनिधी म्हणून मनोहर जोशी कायम स्मरणात राहतील, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या.
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
माटुंगा रुपारेल कॉलेजजवळील डब्ल्यू 54 या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर साडेतीन वाजता त्यांची अंत्ययात्रा निघाली. सायंकाळी पाच वाजता शिवाजी पार्क येथील भागोजी किर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शेकडो शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या या कडवट, कट्टर आणि स्वाभिमानी शिवसैनिकाला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.
मनोहर जोशी यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. सर्वच स्तरांतून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, राज्यपाल रमेश बैस यांच्यासह विविध मान्यवरांनी शोकभावना व्यक्त केल्या.
शिवसेनाप्रमुखांचे खंदे आणि विश्वासू सहकारी
मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिल्या फळीतील नेते होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे आणि विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती. शिवसेनेच्या उभारणीत त्यांचे अमूल्य योगदान होते. ठाकरे कुटुंबाच्या चार पिढय़ांसोबत त्यांनी काम केले होते. या काळात अनेक स्थित्यंतरे झाली पण मनोहर जोशी यांनी शिवसेना हाच श्वास आणि ध्यास मानून शरीर साथ देईपर्यंत पक्षाचे काम अविरतपणे सुरू ठेवले होते. अत्यंत विद्वान, हुशार, मेहनती आणि समर्पित, स्वकर्तुत्वाने राजकारणात मोठी उंची गाठलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याबद्दल सर्वपक्षीयांमध्ये आदर होता.
संकटाच्या काळातही शिवसेनाप्रमुखांच्या सोबत, ‘सर’ कायम राहिले, उद्धव ठाकरेंकडून आदरांजली
मनोहर जोशी सर हे मुख्यमंत्री होते, लोकसभा अध्यक्ष होते, केंद्रीय मंत्री होते, पण त्याहीपेक्षा ते सच्चे शिवसैनिक होते. कोणत्याही पक्षाच्या किंवा व्यक्तीच्या आयुष्यात चढउतार येतच असतात, पण ‘सर’ संकटाच्या काळातही शिवसेनाप्रमुखांसोबत राहिले, शिवसेनेसोबत निष्ठेने राहिले, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
मनोहर जोशी हे शिवसेनाप्रमुखांचे पहिल्या फळीतील सहकारी होते. बेळगाव-कारवार सीमा आंदोलना वेळी शिवसेनाप्रमुखांना अटक झाली होती तेव्हा त्यांच्यासोबत मनोहर जोशी आणि दत्ताजी साळवी होते. शिवसेनाप्रमुखांचे जिवाला जीव देणारे निष्ठावंत शिवसैनिक आपल्यातून निघून जाताहेत हे फार मोठे दुर्दैव आहे, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.
पूर्ण शिवसेना परिवाराच्यावतीने आणि ठाकरे कुटुंबीयांच्या वतीने मी मनोहर जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे उद्धव ठाकरे पुढे म्हणाले. सरांसारखे सगळे जिवाला जीव देणारे कार्यकर्ते त्याही वेळेला होते आणि आजही आहेत, म्हणूनच शिवसेना ही प्रत्येक वेळी संकटावर मात करून पुन्हा उभारी घेऊन उभी राहते, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दौरा अर्धवट सोडला
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जनसंवाद दौऱयावर होते. आज मेहकर तसेच अन्य ठिकाणी ते जनतेशी संवाद साधणार होते. मात्र मनोहर जोशी यांच्या निधनाचे वृत्त समजताच जनसंवाद दौरा अर्धवट सोडून उद्धव ठाकरे बुलढाणा येथून मुंबईत परतले. मुंबईत दाखल होताच थेट दादर स्मशानभूमी येथे जाऊन उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांचे अंत्यदर्शन घेतले व त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.