कधी काळी चाळीत राहायचा हा कलाकार! अभिनेता बनण्यासाठी सोडली होती परदेशातली नोकरी

बॉलिवूडमध्ये गेला काही काळ वेगळ्या धाटणीचे चित्रपट बनू लागले आहेत. आधीच्या चित्रपटांमध्ये नायकप्रधान संहिता होत्या. मात्र, आता चित्र बदलायला लागलं आहे. त्यामुळे टिपीकल हिरो या पठडीत न बसणारे अनेक जण इथे अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवताना दिसत आहेत. असाच एक अभिनेता 16 मे या दिवशी त्याचा 32वा वाढदिवस साजरा करत आहे.

हा अभिनेता म्हणजे मसान, राझी, संजू, उरी अशा चित्रपटांमधून दमदार कामगिरी करणारा विकी कौशल. मध्यमवर्गीय घरातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणाऱ्या विकीने आज आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं आहे. चित्रपटात अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम करणाऱ्या श्याम कौशल आणि त्यांची पत्नी वीणा कौशल यांच्या घरी 16 मे 1988 रोजी विकीचा जन्म झाला. त्याचं कुटुंब मध्यमवर्गीय होतं, त्यामुळे ते चाळीत राहत असत. मुंबईकर असलेल्या विकीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. विकी व्यवसायाने अभियंता असून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या विभागाचं शिक्षण त्याने घेतलं आहे.

vickey-kaushal-white

विशेष म्हणजे, बॉलिवूडमध्ये येण्याआधी त्याला परदेशात नोकरीची ऑफर आली होती. त्याने काही काळ तिथे नोकरी केली. मात्र, अंगातली अभिनयाची आवड त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्या नोकरीला रामराम करून तो पुन्हा मुंबईत आला. त्याने किशोर नमित कपूर यांच्या अभिनय प्रशिक्षण केंद्रात अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आणि बॉलिवूडमध्ये तो स्ट्रगल करू लागला. अनुराग कश्यप यांच्या गँग्ज ऑफ वासेपूर या चित्रपटासाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शकाचं काम केलं. लव शव ते चिकन खुराना हा खरंतर त्याचा पहिला चित्रपट. पण त्याला ओळख मिळाली ती मसान या चित्रपटामुळे. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलं नाही.

मसाननंतर, राझी, संजू, उरी- द सर्जिकल स्ट्राईक, भूत अशा चित्रपटांमधून तो झळकला आणि प्रेक्षकांनीही त्याला आपलंसं केलं. लस्ट स्टोरीज, लव पर स्क्वेअर फूट अशा वेगळ्या वेबसीरीजही त्याने केल्या आहेत. लवकरच तो सरदार ऊधमसिंग यांच्या चरित्रपटात झळकणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या