भायखळा जेलमधून पाच मिनिटांचा व्हिडीओ कॉल; पोलिसांचा वॉच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

तुरुंगात खितपत पडलेल्या कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटणे म्हणजे दिव्यच. भेट झाली तरी पारदर्शक काचेच्या मागून फोनवर ठरावीक मर्यादेतच बोलता येते. आता या काचेपलीकडील नातेवाईकाला थेट व्हिडीओ कॉल करण्याची परवानगी कैद्यांना मिळाली आहे. त्यामुळे भायखळा तुरुंगातून बाहेर व्हिडीओ कॉल गेला तर आश्चर्य नाही. कैद्यांना नातेवाईकांशी फक्त 5 मिनिटे व्हिडीओ कॉलवर बोलता येईल. एका कॉलसाठी 5 रुपये चार्ज आकारला जाणार असून साहजिकच या संभाषणावर पोलिसांचा बारीक वॉच राहणार आहे.

महिला कारागृहे आणि मुक्त कारागृहांतील कैद्यांना ही सुविधा देण्यात आली आहे. देशात पहिल्यांदाच अशी सुविधा कैद्यांना दिली जात असल्याचा दावा तुरुंग विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहातून याची सुरुवात झाली. आता राज्यातील अन्य महिला कारागृहे आणि मुक्त कारागृहांमधील कैद्यांनाही त्याचा लाभ मिळत आहे.

कैद्यांना व्हिडीओ कॉल करायचा असेल तर त्याची पूर्वसूचना तुरुंग अधिकाऱयांना द्यावी लागेल. कोणत्या क्रमांकावरून कॉल करणार त्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी तुरुंग प्रशासनाकडे करावी लागेल आणि प्रशासन देईल त्याच तारखेला आणि वेळेला त्यांना नातेवाईकांशी व्हिडीओs कॉलवर बोलता येईल. मोबाईल फोनची व्यवस्था तुरुंग प्रशासन कैद्यांसाठी असलेल्या कल्याण निधीतून केली जाणार आहे.

मुक्त तुरुंग म्हणजे काय
मुक्त तुरुंग म्हणजे तुरुंगाच्या सीमेअंतर्गत कैद्यांना मुक्तपणे वावरता येते. शिक्षा भोगत असतानाच त्यांना तुरुंगातील कारखाने आणि शेतांमध्ये काम करता येते. एकप्रकारे त्यांना तो रोजगारच असतो. त्याचा मोबदला त्यांना तुरुंगातून सुटताना एकत्रित दिला जातो.

महाराष्ट्र तुरुंग विभागाचे मुख्यालय पुणे येथे आहे. या विभागाच्या अखत्यारित 9 मध्यवर्ती कारागृहे, 31 जिल्हा कारागृहे, 13 मुक्त कारागृहे आणि 172 उप-कारागृहे येतात. महिला कैद्यांसाठी मुंबई आणि पुणे येथे दोन स्वतंत्र कारागृहे आहेत. महिलांसाठी दोन मुक्त कारागृहे पुणे आणि अकोला येथे आहेत. राज्यातील 54 तुरुंगांमध्ये 28 हजार कैदी आहेत. त्यातील 13 ही मुक्त कारागृहे आहेत तर दोन महिला तुरुंग आहेत.

गेल्या वर्षी 1 लाख 11 हजार कैद्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विविध न्यायालयांमध्ये सुनावणी घेतली गेली. यंदा तो आकडा दीड लाखावर जाईल अशी शक्यता आहे. न्यायालयाच्या आदेशावरून प्रत्येक तुरुंगात कॉइन बॉक्सचे फोन लावले गेले आहेत. त्यावरून कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी पाच मिनिटे बोलण्याची मुभा आहे. कैद्यांना त्यांच्या मुलांना भेटता यावे यासाठी ‘गळाभेट’ योजना राबवली जाते. त्याअंतर्गत कैद्यांच्या 16 वर्षांखालील मुलांना तुरुंगातील त्यांच्या पालकांना भेटता येते. कैद्यांसाठी टेलिमेडिसिन सुविधाही आहे. त्याद्वारे ते डॉक्टरांकडून फोनवर वैद्यकीय सल्ला घेऊ शकतात.

summary- video calling facility of prisoners in mumbai