Video – खवळलेल्या समुद्राच्या किनाऱ्यावर फोटो काढणे बेतले जीवावर, 8 जणांना लाटांनी खेचून नेले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समुद्र किनारी उभे राहून खवळलेल्या लाटांसोबत फोटो काढणाऱ्या तरुणींना लाटा समुद्रात ओढून नेतात असा व्हिडीओ मंगळारी व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ कुठला होता ते समजले नव्हते. मात्र ज्याप्रकारे समुद्राच्या लाटांमध्ये त्या महिला वाहून गेल्या ते पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली. आता त्या व्हिडीओची सर्व माहिती समोर आली असून तो व्हिडीओ ओमान देशातील मुघसाइल बीचचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुघसाइल समुद्र किनारी ईदच्या सुट्टीनिमित्त काही जण पर्यटनासाठी आले होते. यावेळी प्रशासनाने समुद्र खवळलेला असल्याने समुद्राजवळ प्रशासनाने तारा लावून त्यापुढे न जाण्याचे आवाहन पर्यटकांना केले होते. मात्र काही अतिउत्साही पर्यटकांनी ते न ऐकता समुद्रा जवळ जाऊन फोटो काढायला सुरुवात केली. यावेळी एक मोठी लाट आली व त्याने दोन तरुणींना ओढून समुद्रात नेले. त्यांच्या नातेवाईकांना काही समजायच्या आता त्या समुद्रात खेचल्या गेलेल्या होत्या. मात्र व्हिडीओत जरी दोन तरुणीच फक्त दिसत असल्या तरी प्रत्यक्षात आठ जणांना लाटेने समुद्रात ओढून नेले होते. त्यातील तीन जणांना वाचविण्यात आले असून पाच जण अद्याप बेपत्ता आहेत.

वाहून गेलेले पर्यटक हे आशियाई कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे. मात्र अद्याप त्यांची ओळख पोलिसांनी उघड केलेली नाही. ओमान पोलीस व बचाव पथक, नौदल वाहून गेलेल्यांचा शोध घेत आहेत. रॉयल ओमान पोलीस याबाबत ट्विट करून माहिती देत आहेत.