हरयाणातही मतदानास सुरुवात, भाजप-काँग्रेसमध्ये चुरशीची लढत

497

महाराष्ट्रासह हरयाणा विधानसभांच्या 90 जागांसाठी आज मतदान होत आहे. या 90 विधानसभा क्षेत्रात मतदानासाठी 19578 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. हरयाणात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई असून सकाळपासून मतदानास संथ सुरुवात झाली आहे. गुरुग्राम येथे ईव्हीएम मशीन नादुरुस्त झाल्याने मतदान एक तास उशिराने सुरू झाले. पण असे असले तरी सामान्य नागरिकांबरोबरच राजकीय नेते, सेलिब्रिटीजही मतदानासाठी उत्सुक असल्याचे चित्र हरयाणात पाहावयास मिळत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वटमधून हरयाणातील जनतेला मतदान करण्याचे व लोकशाहीच्या पर्वात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

टिकटॉकस्टार आणि हरयाणातील आदमपूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजप उमेदवार सोनाली फोगाट यांनी सकाळीच मतदान केले. फोगाट यांच्यासमोर काँग्रेसचे कुलदीप बिश्नोई यांचे आव्हान आहे. तर हरयाणा काँग्रेसच्या अध्यक्ष कुमारी शैलजा यांनी मतदान केले आहे. निवडणुकीला काही दिवस उरलेले असतानाच पक्षाने शैलजा यांना उमेदवारी दिली. यामुळे माजी अध्यक्ष अशोक सिंह तंवर यांनी पक्षाचा राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त केली. यामुळे हरयाणा काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. तर दुसरीकडे गुरुग्राम येथील बुथ क्रमांक 286 मधील ईव्हीएम मशीन नादुरुस्त झाल्याने एक तासासाठी मतदान थांबवण्यात आले होते.

मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर करनाल येथून निवडणूक लढवत आहेत. तर अनिल विज अंबाला कैंट येथून उभे आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसचे भुपेंद्र सिंह हुड्डा गढी सांपला किलोईमधुन आणि रणदीप सुरजेवाला कैथलमधुन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जेजेपीचे दुष्यंत चौताला उचाना कला येथुन निवडणुकीत उतरले आहेत.

हरयाणातील ही निवडणुक भाजप आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. पण भाजप आणि कांग्रेसबरोबरच इंडियन नॅशनल लोकदल आणि नव्यानेच निवडणुकीत उतरलेली जननायक जनता पार्टीही निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. हरयाणात जाट आरक्षण, बेरोजगारी हे प्रमुख मुद्दे असून शेतकऱ्यांसाठी हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. त्यातही राज्यात जाट मतदार 25 टक्के असल्याने सर्वच पक्षांची नजर या मतदारांची संख्या अधिक असलेल्या मतदारसंघांकडे आहे. दरम्यान, भाजपने यावेळी ‘अब की वार 70 के पार’ असा नारा दिला आहे. यामुळे या निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागून राहीले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या