मुंबईचा सलग दुसरा विजय, अय्यरचे दमदार शतक

मुंबईच्या क्रिकेट संघाने मंगळवारी महाराष्ट्रावर 6 गडी व 16 चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला आणि विजय हजारे ट्रॉफीमधील ‘ड’ गटात महत्त्वाच्या चार गुणांची कमाई केली. मुंबईचा हा सलग दुसरा विजय ठरला हे विशेष. कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद 103 धावा आणि अनुभवी मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णी याने टिपलेले 5 बळी या विजयाचे वैशिष्टय़ ठरले.

280 धावांचा यशस्वी पाठलाग

महाराष्ट्राकडून मिळालेल्या 280 धावांचा पाठलाग मुंबईने चार गडी गमावत यशस्वीरीत्या केला. यशस्वी जैसवाल (40 धावा) व पृथ्वी शॉ (34 धावा) यांनी 67 धावांची आश्वासक सलामी दिली. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने (103 धावा) सूर्यकुमार यादव (29 धावा), शिवम दुबे (47 धावा) व सरफराज खान (नाबाद 15 धावा) यांच्यासोबत मुंबईला दिमाखदार विजय मिळवून दिला. श्रेयस अय्यरने आपल्या खेळीत एक षटकार व नऊ चौकार चोपून काढले.

महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या डावात दोन शतके झळकावली गेली. यश नाहरने 119 धावांची आणि अझीम काझीने 104 धावांची खेळी साकारली. महाराष्ट्राने 9 बाद 279 धावा फटकावल्या. धवल कुलकर्णीने 44 धावा देत 5 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

आपली प्रतिक्रिया द्या