
प्रतिष्ठेची विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा सहा शहरांमध्ये 20 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधीत खेळवण्याचा निर्णय हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. स्पर्धेतील सर्व संघ 13 फेब्रुवारीला जैव-सुरक्षित (बायो बबल) वातावरणात दाखल झाल्यानंतर त्यांच्या तीन वेळा कोरोना चाचणी घेण्यात येणार आहेत.
‘बीसीसीआय’चे सचिव जय शहा यांनी शनिवारी या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. सुरत, इंदूर, बंगळुरू, कोलकाता आणि जयपूर या ठिकाणीं पाच गटांचे सामने निश्चित करण्यात आले आहेत. तसेच प्लेट गटातील आठ संघ आपापले सामने तामीळनाडूतील विविध मैदानांवर खेळतील. ‘बीसीसीआय’च्या नियमानुसार खेळाडूंना स्पर्धेआधी तीन तसेच बाद फेरीला सुरुवात होण्याआधी तीन वेळा कोरोना चाचणी करावी लागणार आहे.
स्पर्धेची गटवारी अशी आहे
‘अ’ गट (सुरत) – गुजरात, गोवा, चंदिगड, हैदराबाद, त्रिपुरा, बडोदा
‘ब’ गट (इंदूर) – तामीळनाडू, पंजाब, झारखंड, मध्य प्रदेश, विदर्भ, आंध्र प्रदेश
‘क’ गट (बंगळुरू) – कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ, ओडिशा, रेल्वे, बिहार
‘ड’ गट (जयपूर) – दिल्ली, मुंबई, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, पुद्दुचेरी
‘ई’ गट (कोलकाता) – बंगाल, सेनादल, जम्मू आणि कश्मीर, सौराष्ट्र, हरयाणा
प्लेट गट (तामीळनाडू) – आसाम, उत्तराखंड, नागालॅण्ड, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम

























































