Vijay Hazare Trophy – महाराष्ट्राने रोखला मुंबईचा विजयरथ

महाराष्ट्राने विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत बलाढ्य मुंबईचा विजयरथ रोखत तब्बल १२८ धावांनी बाजी मारत एलिट सी गटात एक देदीप्यमान विजय मिळविला. अर्शिन कुलकर्णीची शतकी खेळी अन् पृथ्वी शॉ, कर्णधार ऋतुराज गायकवाड व रामकृष्ण घोष यांची अर्धशतके ही महाराष्ट्राच्या विजयाची वैशिष्ट्ये ठरली. अर्शिन कुलकर्णी या सामन्याचा मानकरी ठरला.

महाराष्ट्राकडून मिळालेल्या ३६७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा डाव ४२ षटकांत २३८ धावांवर संपुष्टात आला. लागोपाठच्या चार विजयानंतर मुंबईचा हा पहिलाच पराभव होय. रामकृष्ण घोषने दुसऱ्याच षटकात यशस्वी जैस्वालला यष्टीमागे निखिल नाईककरवी झेलबाद करून महाराष्ट्राला सनसनाटी सुरुवात करून दिली, मग प्रदीप दाढेने धोकादायक मुशीर खानचा त्रिफळा उडवून मुंबईला आणखी एक धक्का दिला. मात्र, त्यानंतर दुसरा सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी (९२) व सिद्धेश लाड (५२) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९९ची भागीदारी करीत मुंबईला सावरले. सत्यजित बच्छावने अर्धशतकवीर सिद्धेश लाडला पायचित करून ही जोडी फोडली.

मधली फळी फ्लॉप

सिद्धेश लाड बाद झाल्यानंतर मधल्या फळीच्या फ्लॉप शोमुळे मुंबईने पराभवाच्या दिशेने कूच केली. चिन्मय सुतार (२), शम्स मुलानी (२४), हार्दिक तांबोरे (५) व तुषार देशपांडे (६) अपयशी ठरले. तळाला तनुष कोटियानने नाबाद ३६ धावांची खेळी केली, पण मुंबईचा डाव ४२ षटकांत २३८ धावांवर संपुष्टात आला. महाराष्ट्राकडून प्रदीप दाढेने ३, तर सत्यजित बच्छावने २ फलंदाज बाद केले. रामकृष्ण घोष, राजवर्धन हंगर्गेकर, विकी ओस्तवाल व अर्शिन कुलकर्णी यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.

पृथ्वी, अर्शनचा शो

त्याआधी, नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करताना महाराष्ट्राने ४ बाद ३६६ धावांचा डोंगर उभारला. पृथ्वी शॉ (७१) व अर्शिन कुलकर्णी (११४) यांनी १४० धावांची खणखणीत सलामी देत मुंबईच्या गोलंदाजीची पिसे काढली. पृथ्वीने ७५ चेंडूंत १० चौकार व एक षटकार लगावला, तर अर्शिनने ११४ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह आपली शतकी खेळी सजविली.

ऋतुराज, रामकृष्ण यांची अर्धशतके

सलामीची जोडी तंबूत परतल्यानंतरही मुंबईच्या गोलंदाजांना सुट्टी मिळाली नाही. ऋतुराज गायकवाड (६६) व राहुल त्रिपाठी (२३) यांनीही टॉप गिअरमध्ये फलंदाजी करीत महाराष्ट्राचा धावफलक पळविला. शम्स मुलानीच्या गोलंदाजीवर त्रिफळा बाद होण्यापूर्वी ऋतुराजने ५२ चेंडूंत ७ चौकार लगावले. मग तुषार देशपांडेने त्रिपाठीला मुशीरकरवी झेलबाद केले. मात्र, त्यानंतर रामकृष्ण घोषने मुंबईच्या गोलंदाजांची अवस्था आगीतून निघून फुफाट्यात पडल्यागत झाली. रामकृष्णने २७ चेंडूंत तुफानी ६४ धावांची नाबाद खेळी करताना ५ टोलेजंग षटकारांसह ३ सणसणीत चौकार लगावले. निखिल नाईक ९ धावांवर नाबाद राहिला. मुंबईकडून तुषार देशपांडेने २ फलंदाज बाद केले.