
सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवरील निर्णय प्रलंबित असल्याचा युक्तिवाद करून अन्य न्यायालयात सुरू असलेल्या दिवाळखोरी प्रकरणाच्या कार्यवाहीत अडथळा आणता येणार नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आज विजय मल्ल्याला फटकारले.
एसबीआय बँकेसह अन्य बँकांनी लंडनच्या न्यायालयात विजय मल्ल्याच्या विरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याची विनंती केली आहे. लंडनच्या न्यायालयाने यावर अद्याप निर्णय दिलेला नाही. याच दरम्यान मल्ल्याने कर्ज फेडण्याच्या प्रस्तावासह 27 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत दिवाळखोरी प्रकरणात कोणताही आदेश जारी होऊ नये यासाठी मल्ल्याने लंडनच्या न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर मुख्य न्यायमूर्ती एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठाने मल्ल्याला फटकार लगावली आहे.
कर्जात बुडालेल्या विजय मल्ल्यावर बँकांचे 10 हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याचे आणि मनी लाँड्रिंगचे आरोप आहेत. मल्ल्या लंडनमध्ये असून त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू आहे.































































