विजय पाटील अध्यक्षपदासाठी लढणार ‘एमसीए’ निवडणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी बाळ महाडदळकर गटाचे उमेदवार सोमवारी निश्चित झाले आहेत. अर्थात उद्या (मंगळवारी) अर्ज भरल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होईल. या गटाने विजय पाटील यांना अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला आहे. सर्वांकडून त्यांना पाठिंबा मिळाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या गटातून उपाध्यक्ष म्हणून अमोल काळे, खजिनदार म्हणून जगदीश आचरेकर, सेक्रेटरी म्हणून संजय नाईक आणि सहसचिव म्हणून शाहआलम शेख यांना पसंती देण्यात आली आहे. येत्या 4 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे.

राडा अन् मेमन, सावंत, खांडवाला यांना वगळले

एमसीए निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी मोठा वादंग झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्या दरम्यान नदीम मेमन, मयांक खांडवाला व नील सावंत यांना बाळ महाडदळकर गटातून वगळण्यात आल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

वेंगसरकर, सचिन, अमरेसह 39 क्रिकेटपटू मतदान करणार

एमसीएच्या आगामी निवडणुकीत पहिल्यांदाच माजी क्रिकेटपटूंना मतदान करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यामध्ये दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडुलकर, प्रवीण अमरे या दिग्गजांसह 24 पुरुष आणि15 महिला क्रिकेटपटूंचा समावेश असणार आहे.