
राज्यपालांच्या अभिभाषणात कर्जमुक्त शेतकरी, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र दिसला नाही. हे भाषण म्हणजे शब्दांचा बाजार आणि आकड्यांची फेकाफेक आहे. अभिभाषणात जुन्याच मुद्द्यांची घासूनपुसून उजळणी केली असून, हे सरकार राज्यपालांना तोंडी खोटे बोलायला लावत आहे, अशी जळजळीत टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली.
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होताना वडेट्टीवार यांनी सरकारच्या कारभारावर तोफ डागली. राज्यपालांनी अभिभाषणात सरकारच्या 2047 च्या ‘व्हिजन’चे चित्र रंगवले. वर्ष 2024 मध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन करणार असे हेच सरकार सांगत होते. त्याचा विसर पडलेले सरकार आता थेट 5 ट्रिलियनची भाषा करत आहे. एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे काय झाले हेच ठाऊक नसताना 2026 मध्ये 2047 ची भाषा करणे संयुक्तिक आहे का, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
दावोस गुंतवणुकीतून किती रोजगार मिळाला?
दावोसमध्ये जाऊन केलेले गुंतवणूक करार म्हणजे निव्वळ आकडय़ांची फुगावट आहे. देशातील आणि राज्यातील कंपन्यांशी तिकडे जाऊन करार करण्याचे काय प्रयोजन? दरवर्षी दावोसमधील गुंतवणूक आणि रोजगाराचे आकडे वाढत आहेत. पण प्रत्यक्षात यातून किती रोजगार मिळाला याची श्वेतपत्रिका सरकारने काढावी, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली.






























































