सप्टेंबरमध्ये राज्यातील मुख्य खुर्ची बदलणार – विजय वडेट्टीवार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सप्टेंबर महिना हा राज्यात सत्ता बदलाचा महिना आहे. या महिन्यात राज्यातील मुख्य खुर्ची बदलेल, असे सांगत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उचलबांगडी होणार असल्याचे संकेत दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या मंत्र्यांसाठी वांद्रे येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ‘डिनर’ ठेवले होते. या डिनरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दांडी मारली. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या राजकीय परिस्थितीविषयी विजय वडेट्टीवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्याला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री आहेत. कधी पुण्यातल्या बैठकीला एक उपमुख्यमंत्री दांडी मारतात, तर कधी नागपूरमधील बैठकीला दुसरे उपमुख्यमंत्री दांडी मारतात. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री कधीही एकत्र येत नाहीत. दोन उपमुख्यमंत्री एकत्र आले तर त्या ठिकाणी मुख्यमंत्री येत नाहीत. यावरून राज्यातील सरकारमध्ये सगळे काही आलबेल नाही, असे ते म्हणाले.

कोरडा दुष्काळ जाहीर करा

सध्या राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी यावेळी वडेट्टीवार यांनी केली. राज्यात गेल्या 22 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे राज्य सरकारला कोरडा दुष्काळ जाहीर करावा लागेल. संकटामुळे शेतकऱयांना आत्महत्या करावी लागत आहे. त्यामुळे सरकारला जबाबदारी स्वीकारून काम करावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.