
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात बोलताना छोटे पक्ष संपवण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. यावर काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तिखट प्रतिक्रिया देत भाजपवर हल्ला चढवला. मैत्री करा, त्यानंतर पाठीत खंजीर खुपसा आणि संपवा; हेच भाजपचं धोरण असल्याचा घणाघात वडेट्टीवार यांनी केला.
माध्यम प्रतिनिधींनी बावनकुळे यांच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली असता विजय वडेट्टीवार म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे पूर्वीपासून हेच धोरण राहिले आहे. मैत्री करा, त्यानंतर पाठीत खंजीर खुपसा आणि संपवा. हे खून करण्याचे धोरण भारतीय जनता पक्षाचे पूर्वीपासूनच राहिले आहे. त्यामुळे बावनकुळे जे बोलले ते खरे बोलले आहेत असे मला वाटते. ते खोटे बोलणारे नेते नाहीत. त्यांच्या मुखातून सत्य बाहेर पडल्याचा टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी भाजप हा मित्रांना वापरून फेकून देणारा पक्ष असल्याची टीका केली होती. त्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनीही भाजपवर निशाणा साधला.
View this post on Instagram
जानकर यांच्या वक्तव्याचं समर्थन करताना बच्चू कडू यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला आहे. अकोला येथे बोलताना ते म्हणाले की, भाजपची भूमिका मित्रांना सोबत घ्यायचं आणि काम झालं की सोडून द्यायचं अशी आहे. जोपर्यंत चलती आहे तोपर्यंत हे सुरू राहील, असं ते म्हणाले. अमरावती येथील लोकसभेवर प्रहारचा दावा कायम असल्याचंही ते यावेळी म्हणाले.




























































