राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करा, विजय वडेट्टीवार यांची सरकारकडे मागणी

राज्यात अनेक ठिकाणी अद्यापही पावसाने दडी मारल्याने धरणांत 20 टक्के पाणीसाठा राहिला आहे. खरीप हंगामात शेतकरी कर्जाच्या खाईत सापडला असून, महाराष्ट्र राज्यात तातडीने दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. शेतकर्‍यांना सरसकट 25 हजारांची मदत द्या, विमा कंपन्या, अनुदानाच्या जाचक अटी रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. राज्यात आलीबाबा चाळीस चोर होते, आता दो आलीबाबा ऐंशी चोर मिळून राज्यातील टगे सरकार तिजोरी लुटण्याचे काम करत असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.

पत्रकार परिषदेत वडेट्टीवार यांनी सांगितले की, मराठवाड्यात सध्या भीषण परिस्थिती असून, यामध्ये खुद्द कृषिमंत्र्यांच्या बीड जिल्ह्यात तरुण शेतकरी आपली जीवनयात्रा संपवत आहे. त्यामुळे आता लोकांना सरकारकडून कुठलीही अपेक्षा राहिलेली नाही. कर्नाटक सरकारने दुष्काळ जाहीर करून बळीराजाला दिलासा देण्याचे काम केले. त्या धर्तीवर दुष्काळ जाहीर करून मदत देण्याची मागणी त्यांनी केली. राज्यातील अनावश्यक विकासकामे थांबवून शेतकर्‍यांना मदत करा, सध्याची कामे होत राहतील. शेतकर्‍यांचे आयुष्य सरकारला महत्त्वाची नाही का? असा सवाल त्यांनी केला.

आरक्षणाद्वारे सरकार भांडणे लावण्याचे काम करतंय

आमचे सरकार आले की, पहिल्या कॅबिनेटमध्ये मराठा आरक्षण देऊ, धनगर समाजाला न्याय देऊ, अशा घोषणा भाजपने केल्या. म्हणून त्यांच्या जागा 105 वर पोहचल्या, मात्र आता या जागा 40 वर थांबणार आहे. कारण राज्यात आता सरकारने धनगर, मराठा, ओबीसी आदी आरक्षणांसंदर्भात बनावट आणि बोगस लोकांना हाताशी धरून वातावरण खराब करण्याचे काम करत आहे. यामध्ये बंजारा समाजाचा एसटी (ब) मध्ये समावेश करावा, मूळ एसटी समाजातील 7 टक्के आरक्षण असून, त्याला धक्का लागणार नाही, याची काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यातील बंजारा समाजातील भटक्या विमुक्त जातीत अनेकांनी अधिकार्‍यांना हाताशी धरून बनावट प्रमाणपत्रे व वैधता केली आहे. त्यामुळे अशा अधिकार्‍यांची यादी तयार असून, त्यांची चौकशी आणि मालमत्ता तपासण्याची गरज आहे.

अपात्रतेची सुनावणी पारदर्शी करा

अपात्रतेच्या कारवाईसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात लाईव्ह सुनावणी होते. त्याचप्रमाणे पारदर्शीपणे विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळातील लाईव्ह सुनावणी करण्याची मागणी त्यांनी केली. लोकांना कळू द्या की, राज्यात काय सुरू आहे. शिंदे, फडणवीस, पवार सरकारचे काऊंडटाऊन सुरू झाल्याने ते वाट्टेल ते कामे करून घेत आहेत. केंद्र आणि राज्यातील सत्तेचा दुरूपयोग होत असून, आता सोक्षमोक्ष लावण्याची गरज असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचे दैवत

मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होत आहे. यावेळी युवासेनाप्रमुख, आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार्‍या सोहळ्यासंदर्भात काँग्रेसच्या भूमिकेवर पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर वडेट्टीवार यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वांचेच दैवत आहे. त्यामुळे विरोधकांनी राजकारण करू नये, असा सल्ला त्यांनी दिला.