
‘शोले’ या चित्रपटातील ‘कालिया’ ही भूमिका सहजसुंदर अभिनयाने अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे आज सकाळी गावदेवी येथील राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते. विजू खोटे यांनी पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत हिंदी आणि मराठी अशा सुमारे 300 सिनेमांसह रंगभूमी आणि छोटय़ा पडद्यावरही काम केले होते. त्यांच्या पार्थिवावर दुपारी चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीचे कधीही न भरून येणारे नुकसान झाल्याची भावना कलाकारांनी व्यक्त केली.
विजू खेटे यांनी 1964 साली ‘या मालक’ या सिनेमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी ‘अनोखी रात’, ‘जीने की राह’, ‘इन्सानियत’ अशा काही सिनेमांत भूमिका साकारल्या, परंतु त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती 1975 साली आलेल्या ‘शोले’ या सिनेमातील ‘कालिया’च्या भूमिकेने. ‘तेरा क्या होगा कालिया’ असे गब्बरने विचारल्यानंतर ‘स…स…सरदार, मैने आपका नमक खाया है, सरदार’ असे घाबरत उत्तर देणाऱया कालियाला प्रेक्षक आजही विसरू शकलेले नाहीत. आजही हा संवाद तितकाच लोकप्रिय आहे.
‘अंदाज अपना अपना’ या सिनेमात त्यांनी साकारलेला गोंधळलेला रॉबर्ट असो किंवा ‘अशी ही बनवाबनवी’मधला बळी ही नकारात्मक भूमिका असो, या भूमिकांवरही प्रेक्षकांनी तितकेच प्रेम केले. छोटय़ा पडद्यावर इतिहास रचणाऱया ‘जबान संभाल के’ या मालिकेतही त्यांनी काम केले होते. अगदी अलीकडच्या काळातील ‘अतिथी तुम कब जाओगे’, ‘गोलमाल 3’, ‘व्हेंटिलेटर’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘गरम मसाला’ या सिनेमांतही त्यांनी दमदार भूमिका वठवल्या होत्या.
‘कालिया’साठी मिळाले होते अडीच हजार रुपये
‘शोले’ सिनेमातील कालिया या भूमिकेसाठी त्यांना त्यावेळी अडीच हजार रुपये मानधन मिळाले होते. ही भूमिका आपल्याला कशी मिळाली याची आठवण त्यांनी एका मुलाखतीत सांगितली होती. एकदा संध्याकाळी 4 वाजता मला रमेश सिप्पींचा फोन आला. त्यांनी मला खारच्या ऑफिसला भेटायला बोलावले. ‘शोले’ या चित्रपटात तुझी भूमिका 12 मिनिटांची असेल. भूमिका लहान असली तरी तुझे आयुष्य बदलेल असे रमेश सिप्पी यांनी मला सांगितले. मीदेखील या भूमिकेला लगेच होकार कळवला अशी आठवण विजू खोटे यांनी मुलाखतीत सांगितली होती.






























































