
सगळ्यांना आपापल्या गावाचा अभिमान असतो. गावाशी असलेल्या अनोख्या नात्यामुळे गावाचं नाव काढलं किंवा गावाहून आलेली व्यक्ती भेटली की आपल्याला बरं वाटतं. मात्र जगात एक गाव असे आहे, ज्याचे चारचौघात नाव घेण्यास ग्रामस्थांना लाज वाटते. हे नाव लिहून दाखवलं तरी त्यांच्यासमोर पंचाईत उभी राहाते. लाज आणणारं गावाचं नाव बदलण्यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्नही करून पाहिले, मात्र त्याला अजूनपर्यंत यश आलेलं नाहीये.
डेली स्टारच्या वृत्तानुसार, स्वीडनमधील या अजब गावाचे नाव Fucke असे आहे. सभ्य समाजात हा शब्द उच्चारणे, लिहीणे हे अश्लील मानले जाते. सोशल मीडियावरही या शब्दाला सेन्सॉरशिप आहे. एवढेच नाही तर हे नाव लिहिल्यास तुमचा फेसबुक आयडी ब्लॉक करण्यात येतो. Fucke lake नावाच्या तलावाशेजारी हे गावं वसलेलं आहे. Fucke या शब्दाचा इतिहास हा 1547 सालापर्यंत मागे घेऊन जातो. या शब्दाचा खरा अर्थ हा डोंगर उतारावर असलेल्या तळ्याशेजारील गाव असा होतो. मात्र काळानुसार या शब्दाचा अर्थ बदलला आणि तो अश्लीलतेशी जोडला गेला.
इथली मंडळी त्यांच्या गावाबद्दल फेसबुकवर जेव्हा पोस्ट लिहायला जातात किंवा ऑनलाईन वस्तू विकायला जातात तेव्हा त्यांना ब्लॉक केलं जातं. या सगळ्याला कंटाळून इथल्या स्थानिकांनी गावाचं नाव दाल्सरो असं ठेवावं अशी विनंती तिथल्या प्रशासनाला केली आहे. मात्र नाव बदलण्याच्या प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता असल्याचं तिथल्या स्थानिक वृत्तवाहिन्यांनी म्हटलं आहे. या गावची लोकसंख्या ही 100 च्या आसपास असून गावाच्या बोर्डाशेजारी उभे राहून पर्यटक मंडळी जेव्हा फोटो काढतात तेव्हा आम्हाला जाम वाईट वाटतं असं इथले ग्रामस्थ सांगतात.

































































